Sanjay Raut : नेतृत्वाअभावी शिंदे गटाला पक्षांतराच्या झळा; संजय राऊत यांची प्रतिक्रिया | पुढारी

Sanjay Raut : नेतृत्वाअभावी शिंदे गटाला पक्षांतराच्या झळा; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अडचणी समजून घेणारे ताकदीचे नेतृत्व नसल्याने शिंदे गटातील आमदार-खासदारांना पक्षांतराची झळ सोसावी लागत आहे, असा टोला शिवसेना (उ.बा.ठा) खासदार संजय राऊत यांनी लगावला. मंगळवारी (दि. ३०) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार गजानन किर्तीकर यांच्या भाजपकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीवरील वक्तव्यावर भाष्य करताना त्यांनी शिंदे गटावर घणाघात केला. लोकसभेत शिवसेनेचे १९ खासदार आहेत. त्यातील काही लोक आमच्याकडे नाहीत. पंरतु, या जागेवर आमचे खासदार निवडून कसे येतील, अशी भूमिका ठेवण्यात काही गैर नाही, असे देखील राऊत यांनी स्पष्ट केले. राज्यातील आमदारांसोबत खासदार ही अपात्र होतील, असा दावा त्यांनी केला.

एनडीएची अवस्था वाईट असल्याने भाजप नव्या मित्रांच्या शोधात आहे. अशात एनडीएमध्ये पुन्हा सामील होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना आम्हाला आमंत्रण येणार नाही. आले तरी आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही. प्रादेशिक पक्षांना संपवणे हे भाजपचे धोरण आहे. अशा लोकांसोबत न जाणेच योग्य राहील, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकारची नऊ वर्षे म्हणजे देशातील नागरिकांच्या नाकीनऊ आणणारे ठरले आहेत. देशातील दहशतवाद संपला असे म्हणणाऱ्या भक्तांनी डोळे उघडून देशातील स्थिती समजून घेतली पाहिजे, असे राऊत म्हणाले. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर भाष्य करतांना राऊत म्हणाले, राज ठाकरे उत्तम होस्ट आहेत, लोकांचे स्वागत ते चांगले करतात. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचीच काय इतर कुणाची, कुठेही भेट घेतली तरी देखील आम्हाला, शिवसेनेवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही.

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची थेट चर्चा होत असते. त्यामुळे त्यांच्याविषयी कोण काय म्हणजे यावर काही बोलणार नाही,असे राऊतांनी स्पष्ट केले.पंडीत नेहरुंपासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत देशाच्या सर्व पंतप्रधानांनी देशाची शान वाढवली आहे. पंरतु, मोदींमुळेच जगात भारताची शान वाढली आहे,असे मोदीभक्तांनी जाहीर केले आहे.मोदींचा ऑस्ट्रेलिया दौरा पूर्ण होऊन ते मायदेशी परतताच दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने भारतातील सात राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बंदी घातली. मग ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मोदींना एकीकडे आमचे लीडर्स म्हणतात. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांवर बंदी घालतात. त्यावरून ते किती मोठे नेते आहेत, याची प्रचिती येत असल्याचा टोला राऊत यांनी लगावला.

देशातील दहशतवाद मोदींनी संपवला, असे भक्तांकडून सांगितले जात आहे. मात्र मणीपूरला गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. याकडे कोणी लक्ष देणार आहे का? दुसरीकडे दिल्लीत रोज किमान चार मुलींवर अत्याचार करून खून केले जातात. मग देशातील कोणता दहशतवाद कमी झाला आहे? असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला.

Back to top button