प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटवण्याची मोहीम | पुढारी

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटवण्याची मोहीम

मुंबई : पुढारी वृत्तसेवा लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांनी पटोले यांच्या कार्यपद्धतीबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. पटोले यांच्या विरोधातील तक्रारीमागे थोरात गट असल्याचे सांगितले जाते.

नाना पटोले यांच्या सोबत आपण काम करू शकत नाही, असे सांगत बाळासाहेब थोरात यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता; परंतु अखेर थोरात यांना माघार घ्यावी लागली होती. आता पुन्हा थोरात गट पटोले यांच्या विरोधात सक्रिय झाला आहे. काँग्रेसचे आदिवासी समाजाचे नेते शिवाजीराव मोघे यांनी पटोले यांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्याकडे तक्रार केली होती; तर दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांनी खर्गे यांची भेट घेऊन पटोले यांच्या विरोधात तक्रार केली.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला राज्यात अनुकूल वातावरण आहे. परंतु पटोले हे काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात न घेता काम करत आहेत, अशी तक्रार सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांनी खर्गे यांच्याकडे केली. सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांनी आपण खर्गे यांची भेट घेतल्याचे मान्य केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करायला खर्गे यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. पटोले यांच्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेस अध्यक्षांचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button