मराठी चित्रपटांना लवकरच जीएसटी माफी | पुढारी

मराठी चित्रपटांना लवकरच जीएसटी माफी

मुंबई : चंदन शिरवाळे मराठी चित्रपट उद्योग सावरण्यासाठी राज्य सरकार चित्रपटांना राज्य जीएसटी माफ करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. तसेच थोर आणि महनीय व्यक्तींच्या जीवनावर चित्रपट निर्मिती करण्यात येणार असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यावरील पहिल्या चित्रपटाने याचा प्रारंभ करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.

चित्रपटांना अधिकाधिक प्रेक्षकवर्ग मिळावा आणि मराठी तरुणांनी चित्रपट क्षेत्रात यावे यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्न करीत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. मराठी चित्रपट प्रदर्शीत करणारी चित्रपटगृहे बंद पडली आहेत. मॉलमधील चित्रपटगृहांची महागडी तिकिटे परवडत नाहीत. त्यामुळे मराठी प्रेक्षकांनी तिकडेही पाठ फिरवली आहे. त्यामुळे हा उद्योग तारण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सीजीएसटी करातून मराठी चित्रपटांना सूट नाही. त्यामुळे राज्याचा संपूर्ण जीएसटी माफ करण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील थोर व्यक्तींच्या जीवनावर चित्रपट निर्मिती करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यावर आधारित चित्रपटनिर्मिती करून सुरुवात करणार आहोत.

मराठी कलावंतांचे ओटीटी

चित्रपट अभिनेते आणि अन्य कलावंतांची कला लोकांपर्यंत पोहोचता यावी, यासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत अमेझॉनच्या धर्तीवर आता मराठी कलावंतांचे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. स्टुडिओबाहेर चित्रीकरण केल्यास कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.

Back to top button