

पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये केवळ आठवीच्या यंदाच्या बॅचलाच श्रेणीनुसार मुल्यांकनाची सवलत देण्यात आली आहे. मात्र, मराठी विषय हा कुठेही वगळण्यात आलेला नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरूवारी स्पष्ट केले. मराठी सक्तीचा निर्णय लागू झाला तेंव्हा सहावीत आणि आता इयत्ता आठवीत आलेली बॅच या एकाच बॅचला ही सवलत देण्यात आल्याचे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मराठी सक्तीच्या प्रश्वावर राज्य सरकार बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे.
केंद्रीय मंडळाच्या शाळातील मुलांचे मराठी विषयातील मूल्यांकन श्रेणी पद्धतीने करावे आणि या मुल्यांकनाचा समावेश इतर विषयांच्या गुणांच्या मुल्यांकनात न करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी शासन निर्णयाद्वारे केला होता. त्यावर, मराठी विषयाची सक्ती निष्प्रभ करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत राज्यभरातून त्यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेत खुलासा केला. मंत्री केसरकर म्हणाले की, मराठी अनिवार्यचा निर्णय झाला तेंव्हा प्रथम इयत्ता पहिली आणि सहावीच्या वर्गाला तो लागू करण्यात आला. त्यावेळी सहावीला असलेल्या बॅचला प्रथमच मराठी भाषा विषय आला. ती बॅच आता इयत्ता आठवीला आली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात कोरोनामुळे या बॅचचे मराठी कच्चे राहिले. त्यामुळे या एका बॅचला सवलत देण्याची मागणी होत होती. त्यामुळे केवळ या एका बॅचपुरता निर्णय घेण्यात आल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.
केसरकर पुढे म्हणाले की, आम्ही केवळ एका बॅचपुरते सवलत दिली आहे. त्यामुळे सन २०२२-२३ आठवीला असणारी बॅच पुढे २०२३-२४ ला नववी आणि २०२४-२५ ला दहावीला जाईल. त्यांना एक वेळची बाब म्हणून मराठी विषयाची परीक्षा मार्कांची न ठेवता श्रेणीमध्ये रुपांतरीत करावी आणि एकत्रित मूल्यांकनामध्ये त्याचा समावेश करु नये, असे आदेश देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.
यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्ष १५ जून पासून तर विदर्भातील शाळा ३० जून पासून सुरू होतील. तथापि सध्या असलेली उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी देण्यात येत आहे. सुटीच्या कालावधीत ज्या शाळांना अतिरिक्त उपक्रम राबवायचे असतील त्यांनी ते सकाळच्या अथवा संध्याकाळच्या सत्रात घ्यावेत. तथापि यासाठी नववी अथवा दहावीचे विद्यार्थी वगळता इतर वर्गातील विद्यार्थ्यांना बोलावण्यात येऊ नये. इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाचा बोजा न देता सुटीचा आनंद उपभोगू द्यावा, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.