

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच अन्य काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर हा सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज सकाळी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी काही श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारमार्फत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. स्वतः मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देत माहिती घेतली आणि डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन संपूर्ण समन्वय ठेवून असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत.