Heat Stroke : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट; उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू | पुढारी

Heat Stroke : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट; उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : रविवारी (दि. १६) महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आलेल्या ११ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. ४२ डिग्रीपर्यंत वाढलेल्या उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने ११ श्रीसदस्यांचा उष्माघातामुळे बळी गेला. उष्माघाताचा त्रास झालेल्या सुमारे २०० श्रीसदस्यांवर पनवेल, कामोठे आणि नवी मुंबईतील महापालिका रूग्णालयासह विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा सोहळा खारघर येथील सेंट्रल पार्कच्या भव्य मैदानावर पार पडला. या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे २० लाख श्रीसदस्य आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी फक्त व्हीआयपी पाहुण्यांसाठी दोन शामियाने उभारले होते. बाकी सर्व श्रीसदस्य भर दुपारी उन्हात बसून होते. नियोजित वेळेनुसार कार्यक्रम सकाळी सुरू न होता उशीरा सुरू झाला. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, सचिन धर्माधिकारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भाषणे झाली. तामपानात थेट ४२ डिग्रीपर्यंत वाढ झाल्यामुळे २०० श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला. त्यांच्यावर कार्यक्रमस्थळाजवळच उभारण्यात आलेल्या आमराई रुग्ण सेवा केंद्रात उपचार सुरू करण्यात आले. मात्र उष्माघाताचा तीव्र त्रास होत असलेल्या श्रीसदस्यांना कामोठे येथील एमजीएम, पनवेल येथील उपजिल्हा आणि वाशी येथील महापालिका रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी एमजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ११ सदस्यांचा मृत्यु झाला. अन्य काही श्रीसदस्यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयाच्या सत्रांनी सांगितले.

पाण्याच्या टँकरजवळ चेंगराचेंगरी

पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी येणार्‍या भाविकांकरीता मैदानात विविध ठिकाणी पाण्याचे टँकर उभा केले होते. त्यापैकी एका टँकरवर पाणी पिण्यासाठी श्रीसदस्यांची एकच झुंबड उडाली. त्यावेळी चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले. त्यापैकी काही जणांना वाशी महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

Back to top button