मुख्यमंत्र्यांकडून अहमदनगर, धाराशिवमधील नुकसानग्रस्त भागाची आज हवाई पाहणी | पुढारी

मुख्यमंत्र्यांकडून अहमदनगर, धाराशिवमधील नुकसानग्रस्त भागाची आज हवाई पाहणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (दि. ११) अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत. त्यानंतर या भागातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.

नगर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून गारपीट, पाऊस व वादळी वार्‍याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसाचा फटका कांदा, गहू, चारा पिके, संत्रा, आंबा, द्राक्ष या फळबागांना बसलाच शिवाय घरांची पडझड झाली. महसूल विभागातर्फे पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्यात आले. कृषी विभागाने पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. सर्वाधिक नुकसान जेऊर पट्ट्यात झाले असून, जेऊन, धनगरवाडी पट्ट्यात झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी केली.

शुक्रवारपासून (दि.8) सलग तीन दिवस तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर संत्रा, आंबा व द्राक्ष बागांमध्ये फळगळती झाली आहे. काढणीला आलेला कांदा, चारा पिके भुईसपाट झाली. गारपिटीचा सर्वाधिक फटका जेऊर, देहरे मंडळात बसला असून, जेऊर येथे घरांची पडझड झाली.

जेऊर येथील कल्याण जाधव यांच्या जनावरांच्या गोठ्याचे शेड उडून गेले. शिवाजी तोडमल, ललीता घोरपडे यांच्या घराची पडझड झाली. धनगरवाडी येथील कलाबाई शिकारे, विशाल शिकारे, अशोक जोगदे यांच्या घराचे, तसेच शेडचे नुकसान झाले. घरांचे पंचनामे मंडलाधिकारी वृषाली करोसिया, तलाठी सुदर्शन साळवे यांच्यामार्फत करण्यात आले.

हेही वाचा 

Back to top button