

मुंबई : इंग्रजी शाळांच्या वाढत्या आकर्षणापुढे मराठी शाळांत शिकत असलेले विद्यार्थी कमी होऊ लागले आहेत. गेल्या दोन वर्षांत मराठी शाळांतील तब्बल तीन लाख विद्यार्थी कमी झाले आहेत, तर 500 हून अधिक मराठी शाळा कमी झाल्या आहेत. त्या तुलनेत इंग्रजी माध्यमाच्या 300 शाळा वाढल्या असून, तब्बल 6 लाख विद्यार्थी वाढले आहेत. इंग्रजी शाळांच्या वाढत्या आकर्षणापुढे राज्यातील खासगी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रस्थापित माय मराठी शाळांना उतरती कळा लागली आहे, हे धक्कादायक वास्तव आहे.
राज्यात खासगी अनुदानित, विनाअनुदानित, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अशा मिळून पहिली ते बारावीपर्यंत सर्व माध्यमांच्या तब्बल 1 लाख 8 हजार शाळा आहेत. या शाळांत सुमारे 2 कोटी 11 लाख विद्यार्थी शिकत आहेत. 2022-23 या शैक्षणिक वर्षात 86 हजार 157 शाळांमध्ये 1 कोटी 33 लाख 13 हजार 501 विद्यार्थी शिकत होते, तर 14 हजार 810 इंग्रजी शाळांत 60 लाख 62 हजार 750 विद्यार्थी शिकत होते. 2023-24 या शैक्षणिक वर्षात 259 शाळा कमी झाल्या आणि 1 लाख 68 हजार 664 विद्यार्थी कमी झाले आहेत, तर इंग्रजी शाळा 15 ने वाढल्या आहेत. मात्र, प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांत वाढ झाली असून, 2 लाख 81 हजार 361 विद्यार्थी वाढल्याचे ‘यूडायस’मधील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
शैक्षणिक स्पर्धेत आपला पाल्य मागे राहू नये, या काळजीने पालक मराठी शाळांकडे पाठ फिरवत आहेत. मात्र, स्पर्धेत पाल्य मागे का आणि कशामुळे राहतो, याचा पालकांनीही अभ्यास न करता इंग्रजी शाळांत प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढताना दिसत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून अनेक पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळा खुणावू लागल्या आहेत. यंदाच्या वर्षात तब्बल 287 शाळांची वाढ झाली असून, 2 लाख 94 हजार 913 विद्यार्थी वाढल्याचे दिसत आहे. शाळांची विद्यार्थी नोंदणी चालू असली, तरी हे आकडे फारसे कमी होणार नाहीत, असे दिसत आहे. शाळांवर मराठी भाषा शिकविण्याची सक्ती करण्यापेक्षा सरकारने मराठी माध्यमाच्या शाळा कमी न होता, या ठिकाणी विद्यार्थी कसे वाढतील आणि शाळा कशा सुधारतील, याकडे लक्ष दिले पाहिजे असा सूर आता उमटू लागला आहे.