मुंबई : प्रॉपर्टीच्या वादातून मोठ्या भावाचा दोन भावांच्या मारहाणीत मृत्‍यू | पुढारी

मुंबई : प्रॉपर्टीच्या वादातून मोठ्या भावाचा दोन भावांच्या मारहाणीत मृत्‍यू

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा इस्टेट एजंट असलेल्या रविकुमार राजण्णा मोतकुरी या (वय ४४) भावाचा दोन भावांकडून झालेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला. ही घटना (शनिवार) सायंकाळी अंधेरी परिसरात घडली. प्रॉपर्टीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात उघडकीस आले असून, या घटनेनंतर एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे. त्यात जितेंद्र राजण्णा मोतकुरी, त्याची पत्नी प्रियांका जितेंद्र मोतकुरी, महेंद्र राजण्णा मोतकुरी व त्याची पत्नी भाग्यश्री महेंद्र मोतकुरी यांचा समावेश आहे.

या प्रकणी जितेंद्र आणि महेंद्र या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरु आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता जोगेश्‍वरीतील जेव्हीएलआर, ग्रीन फिल्ड रॉक्स या अपार्टमेंटमध्ये घडली. या अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक डी/४/०३ मध्ये मोतकुरी कुटुंबिय राहतात. रविकुमार, महेंद्र आणि जितेंद्र हे तिघेही सख्खे भाऊ आहेत. रविकुमार हा इस्टेट एजंट तर त्याची पत्नी सपना ही ई-रजिस्ट्रेशनचे काम करते. गेल्या काही महिन्यांपासून या तिन्ही भावांमध्ये प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. हा वाद कोर्टात गेला असून, दिवाणी कोर्टात सध्या त्यांची एक केस सुरु आहे. रविकुमारला हृदयविकराचा त्रास होता. त्यामुळे त्याला जास्त टेन्शन दिल्यास, मारहाण केल्यास त्रास होऊ शकतो, त्याचा मृत्यू होऊ शकतो ही माहिती असताना शनिवारी सायंकाळी पाच वाजता जितेंद्र आणि महेंद्र यांनी प्रॉपटीच्या वादातून वाद घालून रविकुमारला बेदम मारहाण केली होती.

त्याला सोफ्यावर ढकळून दिले होते. या मारहाणीचे सपनाने मोबाईलवरुन व्हिडीओ रेकॉडिंग केले असता, तिला भाग्यश्री आणि प्रियांका या दोघींनी मारहाण केली होती. मारहाणीत रवीकुमार हा बेशुद्ध झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा सायंकाळी मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

यावेळी सपनाने तिच्या पतीच्या मृत्यूस चारही आरोपी दोषी असल्याचे सांगून या चौघांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप केला होता. या आरोपाची वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी गंभीर दखल घेत, त्यांच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सपनाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही भावांसह चौघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे. रविकुमारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान गुन्हा दाखल होताच जितेंद्र आणि महेंद्र या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल असे सांगण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button