Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हे यांची लोकसभेत शाब्दिक टोलेबाजी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महागाईवर बोलणारे नेते मंत्री झाल्यावर बोलतांना दिसत नाही, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावर अमोल कोल्हे भाषण करतांना म्हणाले, लोकसभेतील एक मंत्री फार वर्षांपूर्वी गॅस सिलिंडर हातात घेऊन महागाईवर बोलत होत्या.आज त्या मंत्री झाल्या आहेत. परंतु, महागाईवर बोलताना त्या दिसत नाही. कदाचित त्या विसरल्या असाव्यात की ‘सास भी कभी बहू थी’, असा शाब्दिक हल्ला कोल्हे यांनी इरानींवर चढावला.
पुढे बोलतांना कोल्हे म्हणाले, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग हा ब्रिटिशांच्या काळातला विभाग आहे. या विभागामुळे संपूर्ण देशात अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. महाराष्ट्रात ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ले शिवनेरीवर आजपर्यंत कायमस्वरुपी भगवा ध्वज फडकलेला नाही.जे सरकार घटनेतील कलम ३७० हटवू शकते, ते सरकार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियमांमध्ये सुधारणा करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करु शकत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थिती केला.
बैलाला नॉन एक्झिबिशन, नॉन ट्रेनिंग आणि परफॉरमिंग यादीतून काढण्यात यावे, अशी मागणी देखील कोल्हे यांनी केली. गाईला माता म्हणून पुजत असतांना गोवंश वृद्धीसाठी महत्त्वाच्या असलेल्या बैलाचा समावेश वाघ, सिंह, माकड आणि अस्वलाच्या सूचीमध्ये केला आहे. गोमांस निर्यातीमध्ये आपला देश दहाव्या स्थानावर होता, तो आता तिसऱ्या स्थानावर गेला आहे. सरकारला यामध्ये आंतरराष्ट्रीय षडयंत्र दिसत नाही का? हीच गोष्ट आहे की, जल्लीकट्टू, रेकला आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवर बंधने आणण्यासाठी हेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी धेंडं पुन्हा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जातात. आमची संस्कृती, परंपरा व देशी गोवंशच्या रक्षण करण्यासाठी जे धोरण बाधा उत्पन्न करते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.