एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली म्‍हणून पंतप्रधान मोदी यांनी पाठ थोपटली का? : संजय राऊत | पुढारी

एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली म्‍हणून पंतप्रधान मोदी यांनी पाठ थोपटली का? : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर संपूर्ण महाराष्‍ट्राच्या जनतेचं लक्ष लागून राहिले आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. पक्ष आणि चिन्हांवर आमचाच हक्‍क आहे. बाळासाहेबांचे पुण्य असे कोणालाही पळवून नेता येणार नाही. समृद्धीच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ थोपटल्‍याचे दिसले. जे आम्‍हाला जमले नाही ते तुम्‍ही केले म्‍हणत, शिवसेना फोडल्‍याबद्दल मोदी यांनी शिंदेंची पाठ थोपटली का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच शिवरायांच्या विषयी अपशब्‍द वापरणाऱ्या महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या व्यासपीठावरील उपस्‍थितीवरही त्‍यांनी नाराजी व्यक्‍त केली.

पंतप्रधानांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं. मात्र या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शेवटचं स्‍थान दिल्‍यानं बाळासाहेबांचा अपमाना झाल्‍याच राऊत म्‍हणाले. या कार्यक्रमात महाराष्‍ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांविषयी अपशब्‍द वापरणाऱ्या महाराष्‍ट्राच्या राज्‍यपालांच्या उपस्‍थितीवरही त्‍यांनी टीका केली. तसेच यावेळी मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाची यंत्रणा वापरल्‍याने हा महिलांचा अपमान असल्‍याची टीका संजय राऊत यांनी केली.

महाराष्‍ट्र-कर्नाटक वाद कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यामुळेच 

महाराष्‍ट्र-कर्नाटक वादावर बोलताना हा वाद कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्‍मई यांनी यांनी सुरू केला. आमचं कर्नाटकच्या जनतेशी वैर नाही. हा सीमाभागातील जनतेच्या हक्‍कासाठीचा लढा आहे. हा मानवतेसाठीचा लढा असल्‍याचं म्‍हणत, आमचे मुख्यमंत्री मात्र सीमाप्रश्नावर का बोलत नाहीत? असा प्रश्न राऊत यांनी उपस्‍थित केला.

याचं समर्थन करणार नाही 

भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. कोणावरही हल्‍ला होणे हे चुकीचे आहे. या हल्‍ल्‍याचं आम्‍ही समर्थन करणार नाही, मात्र आंदोलकांच्या भावनेचा उद्रेक का होतो या विषयी राजकीय पक्षांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्‍याची भावना त्‍यांनी व्यक्‍त केली. आमच्यावर जेव्हा हल्‍ले होतात टीका होते. तेव्हा काही लाेकांकडून टाळ्या वाजवल्‍या जातात अशी टीकाही  राऊत यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button