Mumbai : जैविक कचरा उचलणारी कंपनीच गोवर रोगाला कारणीभूत | पुढारी

Mumbai : जैविक कचरा उचलणारी कंपनीच गोवर रोगाला कारणीभूत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एम. पूर्वच्या गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर भागात मागील काही दिवसांपासून गोवर या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. हा आजार मोठ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये आढळून येत आहे. गोवंडीतील रफिकनगर झोपडपट्टी भागात एकाच कुटुंबातील तीन बालकांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. जैविक कचरा विल्हेवाट लावणारी एसएमएस कंपनी व डम्पिंग ग्राउंड या गोवर रोगाला कारणीभूत आहे, असा या न्यू संगम वेल्फेअर सोसायटीने केला आहे.  या सोसायटीचे अध्यक्ष फैय्याज आलम शेख यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. (Mumbai)

गोवंडीत जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट लावणाऱ्या एसएमएस कंपनीमुळे स्थानिक रहिवाश्यांचे आरोग्य धोकादायक बनल्याचा अहवाल अनेक संस्थांनी अहवाल दिला आहे. हजारो लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एसएमएस कंपनीला इतरत्र हलवावे, अशी मागणी देखील अनेक वर्षांपासून होत आहे. एम पूर्व प्रभागात २०१३ पासून आत्तापर्यंत १,८७७ जणांचा क्षयरोगाने मृत्यू झाला आहे. तर ५ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. क्षयरोग, हृदयरोग व घश्याचे आजार याला या ठिकाणचे जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कारणीभूत असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे व वायुप्रदूषणामुळे लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एसएमएस कंपनीच्या विरोधात न्यू संगम वेल्फेअर सोसायटी न्यायालयात कायदेशीर लढाई लढत आहे. गेल्या काही वर्षांपासून ही संस्था या प्रकल्पाविरोधात लढा देत आहे. (Mumbai)

मागील काही दिवसांपासून गोवंडी भागात लहान बालकांमध्ये गोवर हा संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणात फैलावताना दिसत आहे. रफिक नगर झोपडपट्टी भागातील ३ बालके या रोगाने मृत्युमुखी पडले. त्यानंतर आरोग्य प्रशासनाला जाग आली आहे. केंद्रीय पथक देखील याठिकाणी दाखल झाले आहे. मात्र या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या एसएमएस कंपनीबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप फैय्याज आलम शेख यांनी केला आहे.

दरम्यान गोवंडी भागात २५० हून झोपडपट्टी एकत्रित असल्याने गोवर झपाट्याने पसरत आहे. या रोगाला कारणीभूत असणाऱ्या व गोवंडी, मानखुर्द, चेंबूरवासीयांचे आरोग्य धोक्यात घालणारी एसएमएस कंपनी त्वरित बंद करावी अशी मागणी होत आहे.

गोवर हा रोग नाक आणि घशात आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. एसएमएस कंपनी व डम्पिंग ग्राउंडच्या दूषित प्रदूषणामुळे लहान बालकांमध्ये गोवर झपाट्याने पसरत आहे. अशी माहिती फैय्याज आलम शेख यांनी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस पाठविले आहे.
-फैय्याज शेख, न्यू संगम वेल्फेअर सोसायटी अध्यक्ष

हेही वाचा

Back to top button