मुंबई : प्रेयसीसह लिव्ह इन पार्टनरवर अ‍ॅसिड हल्ला; नालासोपार्‍यातील घटना | पुढारी

मुंबई : प्रेयसीसह लिव्ह इन पार्टनरवर अ‍ॅसिड हल्ला; नालासोपार्‍यातील घटना

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पती आणि माजी प्रियकराने एका तरुणासोबत पळून जाऊन लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहाणार्‍या प्रेयसी आणि तिच्या पार्टनरवर अ‍ॅसीड हल्ला केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडली आहे. या अ‍ॅसिड हल्ल्यात पीडित तरुणी आणि तिचा लिव्ह इन पार्टनर कलाम खान हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पेल्हार पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे पीडित 20 वर्षीय तरुणी आणि तिचा लिव्ह इन पार्टनर कलाम खान हे त्यांच्या नालासोपारा येथील घरात झोपले असताना अ‍ॅसिड हल्ल्याची ही घटना घडली आहे. यात पीडित तरुणीचा विभक्त पती तौफिक ईद्रीस आणि माजी प्रियकर कामरान अन्सारी हे दोघे मुख्य संशयित आरोपी असून त्यांचा शोध सुरु आहे.

अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात, आपला वर्षभरापूर्वी इद्रीस याच्याशी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर ती इद्रीससोबत घाटकोपरमध्ये राहू लागली. मात्र इद्रीस हा चारीत्र्यावर संशय घेऊन तिला रोज मारहाण करायचा. त्यामुळे तिने इद्रीसपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एक चिठ्ठी लिहून ठेवत तिने इद्रीसला सोडले. त्यानंतर तिची ओळख घाटकोपरमधील रहिवासी अन्सारी याच्यासोबत झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर पीडित तरुणी अन्सारी याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागली.

इद्रीस आणि अन्सारी हे एकमेकांना ओळखत होते. अन्सारी याने तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला. तिनेही अन्सारी याच्यासोबत असलेले संबंध तोडले. त्यानंतर तिची भेट नालासोपार्‍यातील रहिवासी असलेल्या कलाम खान याच्यासोबत झाली. कलाम आणि पीडित तरुणी नालासोपारा येथे गेल्या काही महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले. इद्रीस आणि अन्सारी यांना या दोगांच्या नात्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर या दोघांनी त्यांच्याशी वाद घालत त्यांना धमकावले होते, असे सांगत पीडित तरुणीने या दोघांवर अ‍ॅसिड हल्ल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.

Back to top button