उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?; मशाल चिन्हावर समता पार्टीने सांगितला दावा | पुढारी

उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?; मशाल चिन्हावर समता पार्टीने सांगितला दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोगाकडून त्यांच्या नवीन पक्षाला मिळालेल्या मशाल चिन्हावर समता पार्टीने दावा सांगितला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे समता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तृणेश देवलेकर यांनी आज (दि.१२) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तृणेश देवलेकर म्हणाले की, निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिले आहे. चिन्ह देण्याबाबत आम्ही ई-मेल पाठवून विरोध केला असून तक्रार दाखल केली आहे. यावर निवडणूक आयोगाने योग्य कार्यवाही केली नाही, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. निवडणूक आयोग दोन्ही पक्षांना एकच चिन्ह देऊ शकत नाही. यासंदर्भातील सर्व माहिती आणि तक्रार आयोगाकडे ई-मेलद्वारे पाठवली आहे. या तक्रारीवर निवडणूक आयोगाने कार्यवाही न केल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे देवलेकर यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, निवडणूक आयोगाने मशाल चिन्ह ठाकरे गटाला दिले असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याप्रकरणी कारवाई करावी, अशीही मागणी देवलेकर यांनी केली.

दिवंगत ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी १९७४ मध्ये समता पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने समता पक्षाला मशाल चिन्ह दिले होते. मात्र, २००४ मध्ये पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली होती. याच कारणामुळे निवडणूक आयोगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्ह दिले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button