दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा?: गणेशोत्सवानंतर निर्णय | पुढारी

दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा?: गणेशोत्सवानंतर निर्णय

मुंबई : पुढारी वृत्तसेवा: दसरा मेळावा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) घेण्यासाठी शिवसेनेसह शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. मैदान मिळवण्यासाठी दोघांनीही महापालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र, यावर अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही. गणेशोत्सवानंतर अर्जाचा विचार करण्यात येईल, असे पालिकेच्या दादर जी-उत्तर विभाग कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर गेल्या 40 वर्षापासून शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा ठाकरेंचा का शिंदे गटाचा यावरून चर्चा सुरू झाली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेतर्फे मुंबई महापालिकेच्या दादर जी-उत्तर विभागात 22 ऑगस्टला अर्ज करण्यात आला. त्यानंतर शिंदे गटाचे दादर येथील आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी 30 ऑगस्टला अर्ज केला.

या अर्जावर अद्यापपर्यंत मुंबई महानगरपालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मैदान मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून विशेषत: राज्य सरकारकडून महापालिकेवर दबाव टाकण्यात येत असल्याचे समजते. मात्र, दोन्ही अर्जाबाबत गणेश उत्सवानंतर निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी स्पष्ट केले. पालिकेचे कर्मचारी गणेश उत्सवामध्ये व्यस्त असल्यामुळे अर्जावर निर्णय घेणे, सध्या तरी शक्य नसल्याचे सपकाळे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button