मुंबई : पुढारी वृत्तसेवा विधानसभा सभागृहात 287 आमदार आहेत; पण त्यापैकी फक्त 40 आमदारांचे लाड सुरू आहेत. याच आमदारांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे पत्र दिले की, एका झटक्यात बदली केली जाते. अशा बदल्या राज्य सरकारला परवडणार्या नाहीत. बदल्या आमदारांनी सांगून होत नसतात. आयएएस आणि आयपीएसच्या बदल्या या मुख्यमंत्र्यांनी केल्या पाहिजेत. तरच प्रशासन व्यवस्थित चालेल. हेच आमदार बाहेर या जिल्हाधिकार्यांची बदली केली तर तू किस झाड की पत्ती, असे सांगत आहेत. भाजपसारख्या पक्षाला हे कसे काय चालते? असा हल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटावर चढविला.
विधानसभेत राज्यातील ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थाच्या प्रश्नावर विरोधी पक्षाच्या वतीने अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावरील चर्चेची सुरुवात करताना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेले डान्सबार तसेच शिंदे गटाच्या आमदारांची दहशतीची भाषा, राज्यातील महिलेवर अत्याचार आदी मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. यावेळी त्यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोले लगावले. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला सदस्याला स्थान न दिल्याबद्दल पवार यांनी फडणवीस यांना सुनावले.
– सत्ता येते आणि जात असते…
फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन; पण उद्धव ठाकरे आले. गेल्या अधिवेशनात सत्ताधारी बाकावरील सदस्य विरोधी बाकावर बसतील, असे कुणी सांगितले असते; तर त्याला वेड्यात काढले असते; पण एकनाथ शिंदे यांनी चमत्कार केला. त्यामुळे सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेले नाही, सत्ता येते आणि जाते. मात्र, तुमची सत्ता आल्यानंतर एक आमदार हात-पाय तोडण्याची भाषा करतो. असे वागणार्या लोकांचा कान पिळून त्यांना सबुरीने वागण्यास सांगा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.