एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर! | पुढारी

एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर!

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लूटली, त्या सुरतेला तुम्ही शरण गेलात. तुमच्यामुळे महाराष्ट्राची बदनामीच झाली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी सत्ताधारी मंत्र्यांना, आमदारांना तर कधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना चिमटे काढले. तर कधी मिश्किल आणि खोचक टीकाही केली.

ससा आणि कासवाची कथा तुम्हाला माहीत आहे. गुलाबराव पाटील उशिरा शिंदे गटात सामील झाले आणि पहिले मंत्री झाले. चिमणआबा मात्र पाठीमागे राहिले व मंत्री झालेच नाहीत. यांच्यासाठी कोणते मेरीट लावले असा सवालही जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. गुलाबराव पाटील यांना मंत्री केले. त्याला विरोध नाही पण शिरसाटांना मंत्री का केले नाही?  कॉंग्रेसकडून आलेल्या सत्तारांना मंत्री केले. नानांसारख्या ज्येष्ठ माणसाचा विचार का केला नाही? असे टिकात्मक आणि मिश्किल चिमटे जयंत पाटील यांनी काढले.

बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभाताई यांना राष्ट्रपती निवडणुकीत पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी यांच्या वेळी पाठिंबा दिला होता. ज्यावेळी महाराष्ट्राला गरज होती तेव्हा शिवसेना सत्याच्या बाजूने उभी राहिली आहे हेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की, तुम्ही महाविकास आघाडीसोबत या मनावर दगड न ठेवता तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची संधी देण्यात येईल, अशी खुली ऑफर जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील नेते होते. परंतु असाही योग येऊ शकतो की, त्या नेत्याला उपमुख्यमंत्री केले जाते. हा महाराष्ट्राचा अपमान केला आहे हे भाजपच्या लक्षात कसे येत नाही, असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

जीएसटीचा इतका अतिरेक झाला आहे की प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावला जात आहे. एक कुटुंब जेवायला बसले की त्यात एक ताट हे जीएसटीच्या नावे केंद्र सरकारला ठेवावे लागते. राज्य सरकार महागाईवर फार हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र राज्य सरकारने केंद्र सरकारकडे कपडे, खाद्यपदार्थ यावर जीएसटी हटवण्याची विनंती करावी, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

हेही वाचलंत का?

Back to top button