

मुंबई : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री म्हणून घेतलेले निर्णय आणि विधिमंडळाच्या संमतीने केलेले स्वतःचेच कायदे बदलण्याची वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली आहे. याचे मला दुःख वाटते, अशी टीका माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी केली. एकनाथ शिंदे, तुम्ही एकनाथच रहा. 'ऐकनाथ' होऊ नका, असा खोचक टोला त्यांनी लगावला. नगराध्यक्ष आणि सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याबाबतचे विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडले होते. त्यावरील चर्चेत सहभागी होताना धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वच पक्षांना सत्तेत येण्याची संधी या अडीच वर्षांत मिळाली. मतदारांनीही ज्यांना ज्यांना मते दिली, ते सर्वच जण सत्तेत आले. पण भाजपने सत्तांतर करून काय साधले? सर्वाधिक आमदार असूनही देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. आधी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते या पदावर तरी होते. आता मात्र ते उपमुख्यमंत्री आहेत, अशी कोपरखळी मुंडे यांनी लगावली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सभागृहात टोलेबाजी केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करणार्या करुणा शर्मा काही वेळातच विधान भवनात दाखल झाल्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सभागृहात एकनाथ शिंदे यांनी मुंडे यांना दिलेला इशारा आणि लगेच करुणा शर्मा यांची मुख्यमंत्र्यांची भेट होणे निव्वळ योगायोग नाही, अशी चर्चा विधान भवनात सुरू झाली. हा एक प्रकारे धनंजय मुंडे यांना सूचक इशाराच असल्याचे मानले जात आहे.
विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, घसा कोरडा पडेपर्यंत तुम्ही आमच्या विरोधात घोषणा देत होतात. पण तुमचाही राजकीय प्रवास आम्हाला ठाऊक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्यावर सतत दया, माया, 'करुणा' केली आहे. पण अशी 'करुणा' एकदाच करता येते. पण देवेंद्र फडणवीस आता पुन्हा पुन्हा तशी 'करुणा' दाखविणार नाहीत, हे लक्षात ठेवा, असा इशाराच शिंदे यांनी धनंजय मुंडे यांना दिला.