

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखाही वाढत आहे. उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत. अनेक जिल्ह्यांतील तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. या वाढत्या उष्णतेमुळे राज्यात गेल्या महिन्याभरात ३० जणांना उष्माघाताचा झटका बसला आहे. मात्र मुंबईत एकही उष्माघाताचा रुग्ण नाही.
राज्यात यंदा तापमानात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहेत. अनेक भागात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचले. २०२३ मध्ये ही संख्या २६४९ वर पोहोचली आणि उष्माघातामुळे १२ जणांना जीव गमवावा लागला. गेल्यावर्षी एप्रिलपर्यंत ४१ रूग्णांची नोंद झाली होती. यंदा केवळ ३० दिवसांत म्हणजे मार्चपासून आत्तापर्यंत ३० जणांना उष्माघातचा त्रास झाल्याची नोंद आहे.
राज्याच्या आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. कैलास बाविस्कर म्हणाले की, वाढत्या तापमानाचा निश्चितच लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यामुळे उष्माघातही होऊ शकतो. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि पुरळ येणे, जे लाल आणि वेदनादायक होते. अशा परिस्थितीत, शरीराचे तापमान १५ मिनिटांत १०६ अंशांपर्यंत चढू शकते. त्यांनी लोकांना हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला आणि दुपारच्या, गर्दीच्या वेळी कठोर कामे टाळा. दिवसा बाहेर पडताना लोकांनी डोके झाकून ठेवावे.
तापमानाचा पारा चढत असून पस्तिशीपार केली असली तरी चाळीशी तापमान असल्याचा अनुभव येत आहे. गुरूवारपासून मुंबईकर घामाघूम होत आहेत. गेले दोन दिवस ढगाळी हवामानामुळे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती मात्र शुक्रवार दुपारनंतर वारा सुटला होता. सांताक्रुझ वेधशाळेमध्ये ३५ अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर किमान तापमान २६ अंशावर आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत.