मुंबई : राज्यात विविध शैक्षणिक संस्थांमधील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया निश्चित होऊनही अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या एसईबीसी आणि ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जुलैअखेरपर्यंत आता हे प्रमाणपत्र सादर करण्याची संधी मिळणार आहे.
वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश निश्चित झालेल्या एसईबीसी आणि ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा राज्य सरकारने दिला आहे. यापूर्वीही राज्य सरकारने गेल्यावर्षी 6 महिन्यांची व 7 जानेवारीस तीन महिन्यांची मुदतवाढ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दिली होती.
एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रवेशासाठी सादर करणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास राज्य सरकारतर्फे 2 मेपासून पुढील तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

