

मुंबई : महाराष्ट्राचे अधिवासी असलेल्या २८२ नौदल अग्निवीरांना राज्याच्या पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.
राज्य सरकारने अग्निवीर म्हणून चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या जवानांना सरकारच्या सेवांमध्ये सामावून घेण्यासाठी समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता. सैन्यात चार वर्षे अग्निवीर म्हणून सेवा बजावलेल्यांची पहिली तुकडी बाहेर पडली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी २८२ अग्निवीरांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात आल्याची माहिती दिली.
देशासाठी लढणार्या अग्निवीरांना शासकीय नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला होता. त्यानुसार, नियमात बदल करून २८२ अग्निवीरांना नियुक्ती देण्यास मंजुरी प्रदान केली गेली. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राचे अधिवासी असलेल्या २८२ नौदल अग्निवीरांची पहिली यादी राज्याला प्राप्त झाली होती. त्यानुसार, १५० खलाशी डेकसाईड व १३२ खलाशी इंजिनसाईड अशा २८२ अग्निवीरांना पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
पोस्ट करून शुभेच्छा
याविषयीचे आदेशही अग्निवीरांना प्रदान करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. त्यांनी या नव्या भूमिकेतील सर्व अग्निवीरांना शुभेच्छाही दिल्या.