Mumbai AC local : 268 ‘एसी’ लोकल खरेदीला मान्यता

पुणे-लोणावळा लोकल मार्गिका उभारण्यास मंजुरी
Mumbai AC local
268 ‘एसी’ लोकल खरेदीला मान्यताpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व लोकल गाड्या वातानुकूलित (एसी) करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानुसार आता पहिल्या टप्प्यात 268 एसी लोकल गाड्यांच्या खरेदीला राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे अनेक निर्णय समितीच्या या बैठकीत घेण्यात आले. या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि विकासाची नवी दिशा व गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

बंद दाराच्या लोकल

मुंबईकरांना बंद दाराच्या लोकल देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूूर्वीच केली होती. तो संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, उपनगरीय रेल्वे सेवेत आधुनिकता आणण्यासाठीही मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या (एमयूटीपी) टप्पा 3 व 3 ए अंतर्गत नवीन गाड्यांची खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल 268 पूर्ण एसी गाड्या खरेदी होणार आहेत. या गाड्या मेट्रोप्रमाणेच बंद दरवाजाच्या, उच्च दर्जाच्या सोयी-सुविधांनी सज्ज असतील. त्यानंतर जुन्या विना-दरवाजाच्या गाड्यांना टप्प्याटप्प्याने हटवून त्याऐवजी या आधुनिक एसी गाड्या प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जातील. विशेष म्हणजे तिकीट दरांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर ट्रेनची खरेदी सुरू होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठाणे ते नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग

ठाणेकर आणि नवी मुंबईकरांसाठीही महत्त्वाची पायाभूत सुविधा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान 25 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, नवी मुंबई आणि मधल्या औद्योगिक क्षेत्रांना वेगवान व समर्पित दळणवळण मार्ग उपलब्ध होणार आहे.

पुणे - लोणावळा नवी मार्गिका

पायाभूत सुविधा समितीच्या या बैठकीत पुणे-लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका उभारणीसही मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणे-लोणावळा कॉरिडॉर अधिक सक्षम होणार असून त्या परिसरातील औद्योगिक, निवासी व व्यावसायिक विकासाला आवश्यक ती कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच पुणे शहरातील वाढत्या ट्रॅफिकचा ताण कमी करण्यासही यामुळे मदत होईल.

याचबरोबर पुणे मेट्रोच्या टप्पा एक अंतर्गत बालाजीनगर-बिबवेवाडी व स्वारगेट-कात्रज या दोन नवीन स्थानकांना मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव राजेशकुमार तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news