
मुंबई : विधानसभा निवडणुकीत एकीकडे राजकीय प्रचाराची धामधूम सुरू असतानाच राज्यात पैसा आणि दारूचा महापूर वाहत असून आतापर्यंत रोख रक्कम, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू मिळून २६२ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जप्तीत तब्बल ३४ हजार लिटरहून अधिक दारूचा समावेश आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत सांगितले की, जप्त वस्तूंमध्ये जवळपास ३ हजार ९०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. तसेच १ हजार ४०० किलो सोने, चांदीसारख्या मौल्यवान धातूंचाही समावेश आहे. ही बातमी लिहिली जात असताना सातारा शहराजवळ शेंद्रे गावच्या हद्दीत एका कारमधून तब्बल ९५ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. नवी मुंबईच्या वाशीतून ही कार रक्कम घेऊन हुबळीला चालली होती. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या रकमेची कागदपत्रे देणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. यासोबतच धुळ्याच्या सांगवीजवळील नाक्यावरही ७० लाख रुपये रोख जप्त झाले. मध्यप्रदेशातून ही रक्कम आणली जात होती.
रोख रक्कम ६४.५० कोटी
दारू - ३४ लाख ८९ हजार ८८ लिटर ३३.७३ कोटी
ड्रग्ज ३८२४.४२२ किलो ३२.६७ कोटी मौल्यवान धातू- १४२८.९८३ किलो-८३.१२ कोटी
मोफत वाटावयाच्या वस्तू ३४ हजार ६३४ नग -२.७९ कोटी
इतर- ८,७९,९१३ (नग) ३६.६२ कोटी
विधानसभा निवडणुकीत पैसा, दारूंसह विविध प्रलोभनांचा वापर केला जात असल्याचे या जप्तीवरून स्पष्ट होते.