मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ‘एक दुजे के लिये’; या जोडीचा अंतही चित्रपटाप्रमाणेच : संजय राऊत | पुढारी

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री 'एक दुजे के लिये'; या जोडीचा अंतही चित्रपटाप्रमाणेच : संजय राऊत

पुढारी ऑनलाइन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच नातं ‘एक दुजे के लिये’ असे आहे. त्यामुळे या जोडीचा अंत ही चित्रपटाप्रमाणेच होईल, चित्रपटात जसा त्या दोघांच्या प्रेमाचा अंत झाला. तसाच या राजकीय जोडीचा अंत होईल, असा खरमरीत टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिंदे गट-भाजपने मिळून सरकार स्थापन केले आहे. यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होतील असा सर्वांनी कयास बांधलेला असताना याला धक्का देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या सर्व पत्रकार परिषदेत निर्णयांची घोषणा करताना शिंदे-फडणवीस एकत्रच दिसले.

दरम्यान, महाराष्ट्रात दररोजच घडणा-या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहे. तर राजकीय टोलेबाजी देखील सुरूच आहे. यावर शिंदे-फडणवीस यांच्या राजकीय भवितव्यावर भाष्य करताना राऊतांनी ‘एक दुजे के लिये’ असा टोला लगावला.

तसेच संसदेच्या प्रांगणात खासदारांना आंदोलन करण्यावर आणलेल्या बंदीवर बोलताना राऊत म्हणाले, देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रयत्न असून याविषयी उद्या संध्याकाळी बैठक होणार आहे.

Back to top button