मुंबई : पुढारी वृत्तसेवा सध्या समोरच्या बाकावर जेव्हा मी पाहतो तेव्हा मला मूळ भाजपवाले कमी दिसतात. आमच्याकडचेच लोक जास्त दिसतात. त्यांना बघितल्यावर मला मूळ भाजपवाल्यांची अवस्था किती वाईट आहे ते कळते, अशा शब्दांत राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाजपला टोला लगावला. विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदनपर भाषणात अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. गणेश नाईक, उदय सामंत, बबन पाचपुते, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पाहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर पाहिले तर पहिल्या रांगेत सारे आमचेच लोक बसले आहेत, असे अजित पवार म्हणाले.
आमच्याकडून गेलेले दीपक केसरकर एकदम भारी प्रवक्ते झाले आहेत. आम्ही शिकवलेले कुठेही वाया गेलेले नाही हे पटलं, असा चिमटा अजित पवार यांनी काढतातच एकच हशा पिकला. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही आपल्या शैलीत चिमटे काढले. ते म्हणाले, हे जे घडलेय त्याने समाधान झालेय का, हे फडणवीस यांनी सांगावे. आता मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी करताच भाजपमध्ये कशी शांतता पसरली होती. भाजपची काही मंडळी रडायला लागली. गिरीश महाजनांचे रडणे तर आताही बंद होत नाही. त्यांना फेटा बांधायला दिला तर तो त्यांनी आजही डोळ्यांचे पाणी पुसायलाच वापरला, अशा कोपरखळ्या अजित पवार यांनी लगावल्या.
चंद्रकांत पाटील आज बेंच वाजवत आहेत. पण तुम्ही बेंच वाजवू नका, तुम्हालाच मंत्रिपद मिळते का नाही पहा, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेतून गेलेल्या 39 जणांपैकी किती जणांना मंत्रिपद मिळेल हे देखील सांगता येत नाही, असे सांगताच सभागृहात आणखीच हशा पिकला.
शिंदेंनी माझ्या कानात सांगितले असते तर…
एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितले असते की, आता अडीच वर्षे झाली आहेत. आता मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, तरी आम्ही तुम्हाला तिथे बसवले असते. काही अडचण आली नसती आणि हे एवढे सगळे करावेही लागले नसते, असे शिंदे यांनी सांगताना अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून 'नसता आला ना प्रॉब्लेम', असेही विचारले. तेव्हा आदित्य ठाकरे यांनीही होकारार्थी मान डोलवत अजित पवार यांना होकार दिला.
शिंदेंनी नार्वेकरांना जवळ करावे!
राहुल नार्वेकर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे आहेत. त्यांच्या बरोबर त्यांनी काम केले आहे. ते ज्या पक्षात जातात, त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या अतिशय जवळ जातात. आमच्याकडून त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. मात्र ती लढवतानाच जर पराभव झाला तर कुठेतरी वर्णी लावायची अट समोर ठेवली. त्यामुळे आम्ही त्यांना विधान परिषदेवर पाठविले. त्यांनी शिवसेनेत आदित्य ठाकरे यांना आपलेसे केले. आता एकनाथ शिंदे, तुम्ही त्यांना आपलेसे करून घ्या, नाही तर काही खरे नाही, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
विधानसभा अध्यक्ष निवड : राजकीय प्रतिक्रिया
शिंदे समर्थक आमदारांना विमानतळावरून पोलिसांच्या बंदोबस्तात आणले गेले. ताज हॉटेल परिसरात आणि रविवारी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीही त्यांना तगडे संरक्षण दिले होते. सभागृहात आल्यानंतर या फुटीर आमदारांचे आमच्याकडे पाहण्याचे धाडस झाले नाही. पोलिस संरक्षणात वावरणारे हे फुटीर मतदारांसमोर कोणत्या तोंडाने जाणार?
– आदित्य ठाकरे, शिवसेना नेतेशिवसेनेच्या 39 बंडखोर आमदारांनी व्हिप विरोधात मतदान केले आहे. त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्षांना येत्या तीन महिन्यांत त्यावर निकाल द्यावा लागेल. तसेच व्हिप झुगारलेल्या आमदारांविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयातही जाणार आहोत.
– जयंत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षशिवसेनेच्या फुटीर आमदारांनी पक्षाचा आदेश (व्हिप) न पाळल्यामुळे महाविकास आघाडीचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांचा विजय झाला असला तरी या निवडीवर आक्षेप घेतले जातील.
– सुनील प्रभू, शिवसेना प्रतोदव्हिप डावलून मतदान करणार्या आमदारांची शिवसेनेने दखल घेतली आहे. त्यांच्यावर विधानसभा अध्यक्षांकडून कारवाई अपेक्षित आहे. विधानसभा आणि सर्वोच्च न्यायालयातही या विरोधात लढाई लढली जाईल.
– अजय चौधरी, शिवसेना गटनेतेभाजपमध्ये मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते आऊटसोर्स आहेत. यावरून निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना यापुढे न्याय मिळणार नसल्याचे अध्यक्षपदाच्या निवडीवरून स्पष्ट झाले आहे.
– यशोमती ठाकूर, माजी मंत्रीमहाविकास आघाडी सरकारला समर्थन दिले असताना त्यांनी किमान समान कार्यक्रम डावलून औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर केल्याने विधानसभा निवडणुकीत आम्ही तटस्थ भूमिका घेतली. किमान समान कार्यक्रमात कोणत्याही शहरांच्या नामांतराचा विषय नव्हता. शहरांचे नाव बदलून काय साध्य करायचे आहे?
– अबू आझमी, प्रदेशाध्यक्ष, स.पा.