मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी 2 लाख 56 हजार 137 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यातून 1 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यामध्ये नाशिकमधील व्हर्च्युओसो कॉम्प्रेसर्स प्रा. लि. 800 कोटींची गुंतवणूक करून 500 जणांना रोजगार देणार आहे. अमरावती येथे टेंबो डिफेन्स प्रोडक्ट प्रा. लि. 1 हजार कोटी गुंतवणूक करत आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि. 1 हजार कोटीची गुंतवणूक करून 1 हजार नवीन रोजगार निर्माण करेल. पुण्याच्या शिरूर भागात जबिल सर्किट इंडिया प्रा. लि. 1500 कोटींच्या गुंतवणुकीतून 3 हजार लोकांना संधी देणार आहे. गडचिरोलीत हरिओम पाईप इंडस्ट्रीज लि. 3,135 कोटींची गुंतवणूक करून 8 हजार जणांना रोजगार देणार आहे. अहिल्यानगरमध्ये निबे स्पेस 4 हजार कोटींच्या गुंतवणुकीसह 1 हजार रोजगार निर्माण करेल.
पुण्याच्या तळेगावला युरोबस इंडिया प्रा. लि. 4200 कोटींची गुंतवणूक आणि 12 हजार रोजगार निर्मिती करेल. चंद्रपूरमध्ये मिलीयन स्टील प्रा. लि. 256.01 कोटींच्या गुंतवणुकीतून 360 रोजगार देणार आहे. भंडारा जिल्ह्यात अशोक ले लँड लि. 10 हजार कोटींची मोठी गुंतवणूक करून 1 हजार रोजगार उपलब्ध करेल. नागपूरच्या बुटीबोरी येथे अॅकमे क्लीनटेक सोल्युशन प्रा. लि. 11 हजार 400 कोटींची गुंतवणूक आणि 7 हजार रोजगार निर्माण करेल. तर याच कंपनीचा रायगड/पालघरमधील ग्रीन स्टील प्रकल्प 11 हजार कोटींची गुंतवणूक आणि 2500 रोजगार देईल.
नागपूरमधील सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लि. 12 हजार 780 कोटींच्या गुंतवणुकीतून 6825 जणांना काम देणार आहे. ग्लोब फोर्ज लिमिटेड, अहिल्यानगर आणि धाराशिवमध्ये 15,430 कोटींची गुंतवणूक करून 3600 रोजगार निर्माण करेल. रायगड येथे बालासोर अलॉयज 17,479 कोटींची गुंतवणूक आणि 3200 रोजगार देणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी न्यु एनर्जी प्रा. लि. 27,515 कोटींची गुंतवणूक करून 4 हजार रोजगार निर्माण करेल. रायगड/पालघरमध्ये अॅकमे क्लीनटेक प्रा. लि. चा ग्रीन अमोनिया प्रकल्प 37,800 कोटींची गुंतवणूक आणि 4500 रोजगार घेऊन येत आहे. गडचिरोलीत रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि. 40,000 कोटींची भव्य गुंतवणूक आणि 20,000 रोजगार निर्माण करेल. सर्वात मोठी गुंतवणूक एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लि. कडून रायगडमध्ये 56,852 कोटींच्या रूपात होणार असून, त्यातून 25 हजार जणांना रोजगार मिळणार आहे.
थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सोलर सेल मॉड्यूल इग्नॉट वेफर्स ग्रीन स्टील ग्रीन अमोनिया इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने अवकाश व संरक्षण साहित्य लिथियम आयर्न बॅटरी इलेक्ट्रीक वाहन निर्मिती - साहित्य स्टील व गॅस टू केमिकल निर्मितीचे विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्यास फडणवीस यांनी मान्यता दिली.
या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच तांत्रिक नवकल्पना, संशोधन-विकास आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही याचा लाभ होणार आहे. याशिवाय, स्थानिक कामगारांना प्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होणार आहे.