174 गावे, 371 चौरस कि.मी. क्षेत्रात वसणार अद्भुत अशी तिसरी मुंबई

आकार असेल सध्याच्या महामुंबईच्या तिप्पट
mumbai News
मुंबईनंतर आता तिसर्‍या मुंबईची निर्मिती सुरू झाली आहे
Published on
Updated on

ठाणे : मुंबई शहरात लोकसंख्येतील वाढती घनता लक्षात घेऊन नवी मुंबईनंतर आता तिसर्‍या मुंबईची निर्मिती सुरू झाली आहे. मुंबईच्या तिप्पट आकाराची ही तिसरी मुंबई 174 गावांना कवेत घेत 371 चौरस किलोमीटर क्षेत्रापर्यंत ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत विस्तारणार आहे. अत्याधुनिक आणि शैलीदार महामार्ग, मल्टिमॉडेल कॉरिडोर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कोकणकडे जाणारा सागरी महामार्ग, मुंबई-गोवा एक्स्प्रेस वेला जोडणारे द्रुतगती महामार्गाचे जाळे असणारी ही अद्भुत तिसरी मुंबई असणार आहे.

मुंबईनंतर आता तिसर्‍या मुंबईची निर्मिती सुरू झाली आहे
मुंबईनंतर आता तिसर्‍या मुंबईची निर्मिती सुरू झाली आहेfile photo

रायगड जिल्ह्यात नैना प्रकल्पातून आकाराला येणार्‍या या नव्या शहरात पनवेल आंतरराष्ट्रीय हवाईअड्ड्यापासून तर अत्याधुनिक रस्त्यापर्यंत अनेक सोयीसुविधा आकाराला येत आहेत. पनवेल, उरण तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडको 14 हजार 321 कोटी रुपये खर्च करून रस्ते उभारणार आहे. नैना क्षेत्र असलेल्या या 23 गावांचा झपाट्याने विकास व्हावा, यासाठी सिडकोने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. भविष्यात हा विस्तार रोह्यापर्यंत जाणार आहे.

मुंबई एमएमआर प्रदेशात पालघर आणि रायगड जिल्ह्यांचे मुख्यालय, अलिबाग, पेण, खोपोली, कर्जत हा सर्व विभाग घेण्यात आल्याने तिसर्‍या मुंबईच्या कार्यक्षेत्रात हा भाग येत आहे. सध्या कर्जत हा हरित तालुका म्हणून ओळखला जातो. मुंबईला दूध पुरवणार्‍या प्रमुख भागात कर्जतचा समावेश आहे. खोपोली, खालापूरमध्ये बर्‍याच प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. हा सर्व भाग आता तिसर्‍या मुंबईत समाविष्ट झाला आहे. तिसरी मुंबई ही थेट मुंबई एक्स्प्रेस-वेला जोडली जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरणाचा भाग येईल. आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोकणकडे जाणारा सागरी महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अशा महामार्गांचे जाळेही येथे सामाविष्ट आहे.

12 नोडची विकासकामे एकाच टप्प्यात होणार

नैना क्षेत्रातील विकासकामे वेगाने होत आहेत. याबाबत स्थानिक गावकरी नाराजी व्यक्त करीत नैना प्रकल्पाला विरोध करीत आहेत. सिडकोकडून नवीन क्षेत्राचा विकास होताना एकसंध न होता तुकड्या तुकड्यात केला जातो. यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त असलेल्या शेतकर्‍यांच्या भूखंडांना योग्य तो भाव मिळत नाही. त्यामुळे यावर विशेष लक्ष देत सिडको आता नैना भागातील 12 नोडची विकासकामे टप्प्याटप्प्यात न करता एकाच टप्प्यात हातात घेणार आहे. याचा आराखडा तयार करण्यासाठी सिडकोने खासगी कंपनीला काम दिले आहे. एकदा आराखडा तयार झाला की, पुढील महिनाभरात सिडको टेंडर काढून कामे हाती घेणार आहे. या संपूर्ण कामासाठी सिडकोला साधारणत: 14 हजार 321 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नैना प्रकल्प काय आहे?

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाद्वारे (सिडको) विकसित केले जाणारे नैना हे 371 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले सुनियोजित शहर आहे. 2013 मध्ये तिसर्‍या मुंबईची घोषणा विमानतळ परिसरात होणारी बेशिस्त वाढ रोखण्यासाठी करण्यात आली. आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि प्रस्तावित ट्रान्स्पोर्ट कॉरिडोर जसे मल्टिमॉडेल कॉरिडोर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर हे महत्त्वाचे ठरणार आहेत.

आधी होता 560 गावांचा समावेश

जानेवारी 2013 मध्ये जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि ठाणे तालुक्यातील एकूण 270 महसुली गावांचा समावेश आहे. या अधिसूचनेनुसार अंदाजे 560 कि.मी.मध्ये पसरले होते. तथापि, सरकारी आदेशानुसार गावे वेगवेगळ्या अधिकार क्षेत्रात हलविण्यात आल्याने या प्रकल्पात काही अडथळे निर्माण झाले. सध्या, या प्रकल्पाचा भाग म्हणून एकूण गावांची संख्या 174 आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news