

मुंबई : विधवा महिला लाभार्थी पेन्शन सुरु करुन देतो, असे आमिष दाखवून खरेदी पत्रावर अंगठ्याचे ठसे उमटून फसवणूक करत 17 एकर शेतजमीन हडपल्याची घटना सांगली जिल्ह्यातील पडळकरवाडी (ता.आटपाडी) येथे घडली. या प्रकरणी खरेदी दस्त तत्काळ रद्द करावी तसेच आपली शेतजमीन परत मिळावी, या मागणीसाठी विठाबाई बापू पडळकर (वय 82) यांनी कुंटूबासमवेत आझाद मैदानात शुक्रवारपासून आंदोलन सुरु केले आहे.
यावेळी विठाबाई पडळकर म्हणाल्या, मला विधवा पेन्शन सुरु करुन देतो असे आमिष पोलीस पाटील अमोल उत्तम पडळकर व कैलास जोतीराम वाघमारे यांनी दाखविले. या दोघांनी 3 एप्रिल 2025 ला आटपाडी नोंदणी कार्यालयात नेले. त्यांनी खरेदी दस्तावर अंगठ्याचे ठसे घेतले. त्यानंतर घरी आणून सोडले. दुसर्या दिवशी माझे नातू राजेंद्र महादेव पडळकर व किरण विलास पडळकर यांनी माझ्याकडे कसले दस्त करुन दिला आहेस, अशी माझ्याकडे चौकशी केली.
माझे विधवा पेन्शनसाठी अंगठ्याचे दस्त घेतले असे नातवांना सांगितले. हे दोघे आटपाडी नोंदणी कार्यालयात गेले तेव्हा दस्त झाल्याचे त्यांना समजले. मला कैलास वाघमारे (रा. झरे) याने रक्कम दिली नाही. माझी कैलास वाघमारे व अमोल पडळकर यांनी फसवणूक केली.
सर्व कुटूंब आटपाडी पोलीस ठाण्यात गेलो. तेथे दमदाटी करुन आम्हाला हाकलून दिले व माझी फिर्याद घेतली नाही. याबाबतची तक्रार सांगली पोलीस अधीक्षक, उपविभागाीय पोलीस अधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे लिखित स्वरूपात केली आहे. माझ्या कुटूंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, शुक्रवारी विठाबाई पडळकर यांनी नातवाबरोबर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाचे सचिव देशमुख यांची भेट घेतली. देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास आटपाडी तहसिलदार यांना असे आश्वासन दिले. पण समाधान न झाल्याने आंदोलन पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय विठाबाई पडळकर कुटूंबियांनी घेतला. बाजारभावाने या शेतजमीनीची किंमत सुमारे 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे पडळकर कुटुंबीयांनी सांगितले.