

मुंबई: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्हीवरची मालिका पाहताना मुंबईत जाऊन अभिनेता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या १६ वर्षांच्या पारसने चक्क घर सोडले आणि एकट्यानेच मुंबई गाठली. मध्य प्रदेशातील छिंदवाड्याहून रेल्वेने प्रवास करत तो मुंबईत आला.
गोरेगावहून पायी फिल्म सिटी गाठली. मात्र, पुढे काय करायचे याची कल्पना नसताना फिल्म सिटी परिसरात भटकत असलेल्या पारसला अखेर आरे पोलिसांनी शोधून काढले. त्यामुळे घरच्यांपासून दूर गेलेला मुलगा सुखरूप सापडल्याने त्याच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.
पारस रतिराम वर्मा (१६) हा मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील हिवरखेडी, ब्लॉक चौराई येथील रहिवासी आहे. ७ ऑगस्ट रोजी फिल्म सिटी परिसरात एक अल्पवयीन मुलगा एकटाच फिरत असल्याची माहिती उत्तर नियंत्रण कक्षाला अनोळखी व्यक्तीने दिली. त्यानंतर ही माहिती आरे पोलिसांना तात्काळ वायरलेस मेसेजवरून देण्यात आली.
ही माहिती मिळताच आरे-३ मोबाईल पोलिस पथकाने फिल्म सिटी गाठली आणि एकटाच फिरत असलेल्या पारसला ताब्यात घेऊन पोलीस पथक पोलीस ठाण्यात आले. त्याची चौकशी केली असता पारसने मुंबईत येण्यामागचे कारण सांगितले. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत काम करायचे आहे, हे स्वप्न घेऊन तो मुंबईत आला होता. या स्वप्नापायी त्याने घरच्यांना न सांगता घर सोडले, याची कबुली त्याने दिली.
छिंदवाडा ते मुंबई एकट्याने प्रवास
पारस ६ ऑगस्टला छिंदवाडा रेल्वे स्थानकातून ट्रेनने निघाला. सायंकाळी सहाच्या सुमारास तो नागपूरला पोहोचला. त्यानंतर सायंकाळी ६.५० वाजता नागपूरहून मुंबईकडे येणारी ट्रेन पकडली.
७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबईत पोहोचल्यानंतर त्याने लोकलने गोरेगाव गाठले. तेथून पायीच फिल्म सिटीचा रस्ता धरला. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर तो एकटाच परिसरात फिरत होता.
पोलिसांनी पारसकडून त्याच्या वडिलांचा मोबाइल क्रमांक घेतला आणि त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी मुलाचे वडील घाबरून गेले होते. कारण, पारस ६ ऑगस्ट रोजी शाळेत जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो थेट मुंबईला निघून आल्याचे त्यांना माहीत नव्हते.
पोलिसांनी पारस सुरक्षित असल्याचे सांगताच त्याच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. मुलाला घेण्यासाठी त्याचे वडील मुंबईकडे निघाले. तोपर्यंत पारसला आरे पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.