शरद पवार म्हणतात, पुरंदरेंचा विरोध करतील त्यांचा मला नेहमी अभिमान | पुढारी

शरद पवार म्हणतात, पुरंदरेंचा विरोध करतील त्यांचा मला नेहमी अभिमान

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल ठाण्यात उत्तर सभा घेत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरदेखील राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. यावर शरद पवार यांनी राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्यासारखे काही नाही. त्यांना जनतेने योग्य जागा दाखवली आहे असे सांगत पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या इतिहासावर निशाणा साधला.

पवार पुढे म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या पुस्तकात चुकीचा इतिहास दाखवला, त्यांचा मी यापूर्वीही विरोध केला आणि आजही करतो, जे पुरंदरेंचा विरोध करतील त्यांना माझा नेहमी पाठिंहा राहिल, असेही ते म्हणाले. पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात जिजामातेने महाराजांना घडवलं, हे सांगण्याऐवजी दादाजी कोंडदेव यांनी घडवल्याचं म्हटले होते.

त्याला माझा सक्त विरोध आहे. महाराजांना जिजामाता यांनीच घडवले आहे. महाराजांच्या आयुष्यात सर्वात मोठे योगदान जिजामातेंचे आहे. पुरंदरेंनी चुकीची माहिती दिली, त्याला माझा विरोध आधीही होता आणि आताही आहे. राज ठाकरे म्हणतात मी शिवाजी महाराजांचे भाषणात नाव घेत नाही पण शाहू, फुले आणि आंबेडकरांचे नाव घेतो. पण, याचा मला अभिमान आहे. या राज्यात शिवछत्रपतींचे सविस्तर वृत्त काव्यांच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी सर्वात आधी लिहिले.

शाहू,फुले, आंबेडकर यांना महाराजांबद्दल खूप आदर होता. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सत्तेचा वापर कसा करावा, याचा विचार तिन्ही पक्षांनी केला आणि त्यातूनच महाराजांच्या विचाराची मांडणी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पवार म्हणाले.

शरद पवार म्हणतात, राज ठाकरे यांचे वाचन कमी

राज ठाकरे यांचे वाचन कमी आहे. त्यामुळे त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असा सल्ला त्यांनी दिला. शरद पवार नास्तिक आहेत, ते कुठल्या मंदिरात गेलेले पाहिले आहे का? राज ठाकरे यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले की, मी बारामतीतील मंदिरात जात असतो. पण मंदिरात जाण्याचा गाजावाजा करत नाही.

एसटी कर्मचाऱ्यांनी घरावर केलेल्या हल्ल्यावर ते म्हणाले की, मी कामगारांना दोष देत नाही. पण न्यायालयाच्या निर्णयावर कामगारांकडून जल्लोष करण्यात आला. मग दुसऱ्या दिवशी माझ्या घरावर हल्ला का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. ईडी कारवाईबाबत ते म्हणाले की, अजित पवार यांच्याबाबत जे झाले ते माझ्याकडेही झाले. अजित पवार, सुप्रिया सुळे बहिण भाऊ आहेत, ते वेगळे नाहीत.

Back to top button