

अदिती कदम
मुंबई : राज्यातील सरकारी रक्तपेढ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 2025 दरम्यान राज्यातील 77 सरकारी रक्तपेढ्यांमध्ये तब्बल 15 हजारांहून अधिक रक्तपिशव्या वाया गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रक्ताची एक्सपायरी डेट, संक्रमण, गळती, दूषित होणे आणि अपुरी मात्रा यासारख्या कारणांमुळे हे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषद सतर्क झाली असून, सर्व रक्तपेढ्यांना स्टॉक अपडेट आणि रक्त हस्तांतरणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, याच कालावधीत राज्यातील सरकारी रक्तपेढ्यांमध्ये सुमारे 3 लाख 93 हजार युनिट रक्तसंकलन झाले. महाराष्ट्रातील एकूण 410 नोंदणीकृत रक्तपेढ्यांमध्ये 23 लाखांहून अधिक युनिट रक्त जमा करण्यात आले असून, त्यापैकी 307 रक्तपेढ्या धर्मादाय संस्थांकडून, तर 77 सरकारी नियंत्रणाखाली कार्यरत आहेत.
ई-रक्तकोशवरील माहिती अपडेट नसल्याने अडचणी
‘एसबीटीसी’च्या ऑनलाईन आढावा बैठकीत ई-रक्तकोश प्लॅटफॉर्मवरील अनियमित माहितीचा मुद्दा गंभीरपणे समोर आला. अनेक रक्तपेढ्या दररोज रक्तसाठ्याची माहिती अपडेट करत नसल्याचे अधिकार्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण आणि नातेवाईकांना रक्त उपलब्धतेबाबत त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे.
नियमांचे पालन न केल्यास कारवाई
बैठकीत आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक आणि रक्त संक्रमण अधिकार्यांना ई-रक्तकोश आणि महा-एसबीटीसी पोर्टलवर दररोज रक्तसाठ्याची माहिती अपडेट करणे बंधनकारक केले आहे. आंतरजिल्हा आणि आंतरराज्य रक्त हस्तांतरणातील अनियमिततेबाबतही चिंता व्यक्त केली.