मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे सरलेले संकट आणि पूर्वपदावर आलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा सन 2022-23 चा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 11) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात ते कोणत्या नव्या घोषणा करतात, याबाबत उत्सुकता आहे. (Maharashtra Budget 2022)
महाविकास आघाडीत शिवसेनेच्या खात्याला आणि आमदारांना पुरेसा निधी मिळत नसल्याच्या तक्रारी शिवसेना मंत्री आणि आमदारांनी केल्या होत्या. या अर्थसंकल्पात त्यांचे समाधान अर्थमंत्री करतात का? याकडेही लक्ष लागले आहे.
दुपारी 2 वाजता अजित पवार विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडतील. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या राज्याच्या सन 2021-22 च्या आर्थिक पाहणी अहवालात कोरोना संकट सरल्याने अर्थव्यवस्था पूर्वपदावर आल्याचे चित्र समोर आले आहे.
आर्थिक पाहणीनुसार, देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9 टक्क्यांची वाढ झाली असताना, राज्य अर्थव्यवस्थेत 12.18 टक्के वाढ झाली आहे. कृषी क्षेत्राने यंदा निराशा केली असली, तरी उद्योग आणि सेवा क्षेत्राने चांगली कामगिरी केल्याने अपेक्षित उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ घालताना सुमारे 10 हजार कोटींचीच तूट अपेक्षित आहे. ही बाब राज्य सरकारला दिलासा देणारी आहे. (Maharashtra Budget 2022)
त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याने महाविकास आघाडीला नवीन योजना आणि घोषणा करण्यास संधी आहे. ही संधी सत्ताधारी साधतात की नाही? ते स्पष्ट होणार आहे.