मुख्यमंत्री मैदानात उतरताच बंडोबा थंड; 125 नरमले!

साहित्य संमेलनाच्या मंचावरूनही फोनाफोनी
121 Rebel Candidatures Withdrawn
सातारा : बंडोबांना थंड करण्यासाठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी सुरूच होती.File Photo
Published on
Updated on

मुंबई : महानगरपालिकांच्या निवडणुकीत शुक्रवार अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री बंडखोरांशी संवाद साधून माघार घेण्याविषयी आग्रह करीत होते. माघारीची वेळ दुपारपर्यंत असल्याने व्यस्त कार्यक्रमातही मुख्यमंत्र्यांचे ‘ऑपरेशन मनधरणी’ सुरू होते. अगदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरूनही मुख्यमंत्री फोनाफोनी करीत होते. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकत्रित ‘ऑपरेशन मनधरणी’ राबवत भाजपच्या 121 बंडखोरांची उमेदवारी मागे घेण्यात यश मिळवले.

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत शुक्रवार माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बंडोबांना थंड करण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न सुरू होते. प्रत्येक जिल्ह्यात भाजपने यासाठी जबाबदारी निश्चित केली होती, त्यांना अपयश आले तर मुख्यमंत्री स्वत: चित्रात येत संबंधित बंडखोरांशी संवाद साधत होते. सातार्‍यात अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे औपचारिक उद्घाटन शुक्रवारी झाले. या सोहळ्यास मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. यावेळी सारस्वतांसमोर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, एखाद्या मंचावर असताना मी मोबाईलवर बोलत नाही. आज मात्र तुम्ही पाहिले असेल की, मी सतत बोलत होतो. त्याबद्दल सर्वप्रथम आपली माफी मागतो.

आज महापालिका निवडणुकांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. सगळ्या पक्षांत इतकी बंडखोरी आहे आणि सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म मागे घेत नाहीत. त्यामुळे फॉर्म मागे घेण्यासाठी बोलत होतो. मनधरणी सुरू होती, असे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

नागपुरात घरात बंद करून ठेवलेल्या गावंडे या उमेदवारासह राज्यभरातल्या भारतीय जनता पक्षाच्या बंडोबांना फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून शांत केले. पक्षामध्ये योग्य सन्मान राखला जाईल आणि संघटनात्मक कामात योग्य पद दिले जाईल, अशी मनधरणी करण्याचे सूत्र पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी अवलंबले होते. फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी राज्यभरातील कोणते बंडखोर महत्त्वाचे असून, त्यांना शांत करायला पाहिजे याची यादी केली होती. या दोघांनीही कोण कुणाचे ऐकेल, हे शोधून काढत त्यांना प्रथमतः निरोप देणे सुरू केले. जी मंडळी रवींद्र चव्हाण यांनाही बधली नाहीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोनचा आग्रह धरत होती, ती नंतर थेट मुख्यमंत्र्यांनी संवाद साधल्यामुळे शांत झाली. तरीही भाजपचे सुमारे 90 बंडखोर अजूनही रिंगणात आहेत. यातील सुमारे 40 बंडखोर हे निवडून येण्याच्या ताकदीचे आहेत, असे मानले जाते. आता पुढे काय? याबाबत विचार न करता जिंकून आला तो आपलाच असेही म्हणायला हवे, असा विचार पक्षात बोलला जात होता.

सकाळपासून सुरू झालेल्या ‘ऑपरेशन मनधरणी’अंतर्गत नाशिक येथील प्रचंड उद्रेक शांत करण्यासाठी गिरीश महाजन, विदर्भातील नाराजांना शांत करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री कामाला लागले होते. मुंबईतील ही धुरा आशिष शेलार यांनी सांभाळली. हे तिघेही मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष व त्यांचे सहकारी आज ‘ऑपरेशन मनधरणी’ या कार्यक्रमात गुंतले होते. दुपारी चार वाजल्यानंतरच या मंडळींना उसंत मिळाली. स्वतः फडणवीस यांनी पक्षासाठी त्याग करा, त्यागाचे मोल नेते जाणतात, असे सांगत माघारीची योग्य ती दखल घेतली जाईल, असे सांगत काहींना शांत केले आहे. पक्ष मोठा झाला आहे. पक्षात प्रत्येकालाच नगरसेवक म्हणून स्थान देणे कठीण असल्याने जरा समजून घ्या, असेही ते सांगत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे संघटनात्मक पातळीवर काही ठिकाणी सुटकेचा नि:श्वास टाकला जात होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news