मुंबई; पुढारी ऑनलाईन : भाजप आमदार नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. ते आज कणकवली न्यायालयात शरण आले आहेत. न्यायालयात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राणे यांच्या वतीने अँड. सतीश माने शिंदे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राणे १० दिवसात न्यायालयासमोर शरण येण्याची संधी दिली होती.
ही मुदत ४ फेबुवारीला संपण्यापूर्वी राणे यांनी शरण येण्यासंदर्भात कोणतेही कागदपत्रे सादर न केल्याने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळला. त्यामुळे प्रथम राणे शरण येतील आणि जामीन अर्ज करतील. त्यावर न्यायालय काय निर्णय देईल त्यावर उच्च न्यायालयात दाद मागता यावी म्हणून उच्च न्यायलयातील अर्ज मागे घेण्यात आला आहे
मंगळवारी सत्र न्यायलायाने आ. राणे यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळल्याने आता पुन्हा ते हायकोर्टात जाणार असल्याची माहिती राणेंच्या वकिलांनी दिली होती. सुप्रीम कोर्टाने दहा दिवासांची मुदत दिल्यामुळे राणेंना दहा दिवस अटक होऊ शकत नाही, अशी माहिती नितेश राणेंच्या वकिलांनी दिली. तर पोलिसांनी राणेंना अडवल्यावरून त्यांना विचारले असता ही पोलिसांची दादागिरी आहे. पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केला आहे, ते आम्ही उच्च न्यायालयात मांडू असेही राणेंचे वकील म्हणाले.
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी दाखल गुन्ह्यात आपल्याला अटक होऊ नये, यासाठी भाजपचे आ. नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयाकडे केलेला जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी फेटाळून लावला. जामीन अर्ज फेटाळल्याने आ. नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायलायाच्या आदेशानुसार आ. नितेश राणे यांना 6 फेब्रुवारीपर्यंत अटक करता येणार नसल्याने आ. राणे मंगळवारी घरी जाऊ शकले. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आ. नितेश राणे उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाची ऑर्डर निघालेली नसतानाही आ. नितेश राणे न्यायालयाबाहेर पडण्यासाठी निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी आ. राणे यांची गाडी अडविली. त्यामुळे माजी खासदार नीलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे न्यायालय परिसरातील वातावरण काल काही काळ गंभीर बनले होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी कणकवलीत हल्ला झाला. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते.
या प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात आ. नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आपल्याला अटक होवू नये यासाठी आ. राणे यांनी प्रथम जिल्हा न्यायालयात, त्यानंतर उच्च न्यायालय व सर्वोच्च नायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवार 24 जानेवारी रोजी फेटाळला होता.
यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात हजर होण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने नितेश राणे यांना 10 दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार राणे यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर सुनावणी सोमवारी पूर्ण झाली होती. मंगळवारी यावर जिल्हा न्यायालयाने निर्णय देत आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.