बीड – केज रोड वर राज्य राखील दलातील पोलीस जवानालाच लुटण्याचा प्रकार घडला. पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात कार्यरत असलेला जवान हा गावाकडे सुट्टीवर आला होता. दरम्यान तो आणि त्याची पत्नी हे दोघे स्कुटीवरून जात असताना त्यांना बीड-केज रोडवरील सावंतवाडी पाटी टोल नाक्याजवळ लुटण्यात आले. तीन चोरट्यांनी मोटरसायकल आडवी लावून त्यांना मारहाण केली. गळ्यातील सोने मोबाईल व नगदी रोख रक्कम पळविली असल्याची थरारक घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील सांगवी येथील सोमेश गोरख धस हा पुणे येथे राज्य राखीव दलात शिपाई या पदावर कार्यरत आहे. तो चार दिवसापूर्वी त्याच्या मेव्हणीच्या लग्नासाठी गावी आला होता.
दि. ९ ऑगस्ट रोजी सोमेश धस व त्याची पत्नी स्नेहल सोमेश धस हे दोघे त्यांच्या स्कुटी गाडीवरून सांगवी (सारणी) येथून केजकडे ( बीड – केज रोड ) येत होते. दरम्यान रात्री ८:१५ वा. च्या सुमारास बीड – केज रोड वरील सावंतवाडी टोलनाक्या जवळ पाठीमागुन एका मोटार सायकलवर तीन ईसम आले.
त्यांनी सोमेश धस व त्याची पत्नी यांच्या स्कूटीला मोटार सायकल आडवी लावली. त्यानंतर स्कुटी उभी केली असता त्या तीन पैकी एकाने त्यांच्या स्कुटीची चावी काढून घेतली. इतर दोघांनी त्याच्या पत्नीला हाताला धरून ओढत बाजुच्या उसाचे शेता मध्ये नेले. त्या वेळी त्याची पत्नी ओरडत असताना ओरडू नको. असे म्हणून तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
ते पाहून सोमेश त्यांना प्रतीकार करु लागला. त्यावेळी एकाने सोमेश त्याच्या हात, करंगळीला व छातीला जोराचा चावा घेतला. तीघांनी पोलीस जवान सोमेश धस याच्या तोंडावर, डोक्यात आणि पाठीवर दगडाने मारहाण सुरु केली. दरम्यान जवानाच्या पत्नीजवळ जावून तिच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याचे मिनीगंठण ( किंमत ६० हजार रुपये ) हिसकावले.
तसेच पत्नी जवळ असलेला १८ हजार रुपयांचा मोबाईल आणि रोख ६ हजार रुपयेही बळजबरीने काढून घेतले. या वाटमारीत पोलीस शिपाई व त्याची पत्नी यांच्या कडील सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असे एकूण ८४ हजार ६०० रुपयांची ची अज्ञात चोरट्यानी लूट केली.
या प्रकरणी सोमेश धस यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गु. र. नं. ३८९/२०२१ भा. दं. वि. ३९४ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बीड – केज रोड रॉबरीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच प्रभारी डीवायएसपी लगारे, पोलीस निरीक्षक मिसळे, डीबी पथकाचे दिलीप गित्ते यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच उस्मानाबाद येथील श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले.