आष्टी, पुढारी वृत्तसेवा ः जळगाव जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात कत्तली साठी नेण्यात येत असलेल्या 16 गोवंशाची आष्टी पोलीसांनी सुटका केली. या प्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन 22 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
परतूर येथुन आयशर वाहनातुन काही इसम गोवंश घेऊन आष्टीकडे येत असल्याची माहिती आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांना मंगळवारी रात्री मिळाली होती. आष्टी पोलिसांनी अंबड, परतूर, पाथरी चौफुलीवर सापळा लावला. यावेळी संशयीत आयशर (क्रमांक एम 20 ई एल 9107 )ची तपासणी केली असता पोलिसांनी चालक शेख इरफान शे लूकमान व शे अनिस शे बिभन वाहनातील गोवंशाबाबत विचारले. मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे देता आले नाही. वाहनात 16 गोवंश दाटीवाटीने दोरीने बांधलेले असल्याचे निदर्शनास आले.
पोलीसांनी आयशर सह दोघांना आष्टी पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता जळगाव जिल्ह्यातील पहुर येथून हे गोवंश घेऊन ते उदगीर (जि. नांदेड) येथे नेत असल्याचे समजले. या गोवंशाची कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे अथवा परवाना नव्हता . हे गोवंश जळगाव येथील सुफडु शेठ यांच्या मालकीची असल्याचे चालकाने पोलीसांना सांगितले.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी विनोद वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर चालक शेख इरफान शेख नुकमान व शेख अनिस शेख बिभन (दोघे रा. सिल्लोड जि.औरंगाबाद) या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून चार लाख रुपये किमतीचे 16 गोवंश जजनावरे व 18 लाख रुपये किमतीचे आयशर असा 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपास सहाय्यक फौजदार आर.आर.गौड हे करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी राजु मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, सज्जन काकडे, विनोद वाघमारे आदींनी केली आहे.