चाकूर; पुढारी वृत्तसेवा : लातुरमध्ये महाविद्यालयातील प्रवेश प्रकिया पूर्ण करुन येणाऱ्या सख्या बहिण-भावांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. मोटारसायकलवरून गावाकडे परतत असताना भरधाव वेगातील टिप्परने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. ही घटना सोमवारी (दि. ३) दुपारच्या सुमारास लातूर-चाकूर मार्गावरील आष्टामोड येथे घडली.
अवधूत शिवराज रकताटे (वय १८) आणि निकिता शिवराज रकताटे (वय २० वर्षे) असे मयत बहीण- भावाचे नाव आहे. दोघेही राहणार अंबुलगा ता.चाकूर येथील आहेत. अधिकची माहिती अशी की, निकिता रकताटे आणि अवधूत दोघेही शैक्षणिक प्रवेश निश्चित करण्यासठी लातूर येथे गेलेले होते. निकिताचा बी.कॉम आणि अवधूत बी.एससीला प्रवेश घेणार होते. प्रवेशाचे काम आटोपून दुपारी मोटरसायकलवरुन (एमएच २४, बीडी ३२२७) गावाकडे परत येत असताना आष्टामोड आले. यादरम्यान खडी भरुन लातूरकडे भरधाव वेगात निघालेल्या टिप्परने (एमच २०, ईआय ७२०४) त्यांना समोरुन जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोघा सख्ख्या बहीण- भावांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने अंबुलगा गावावर शोककळा पसरली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी अपघातस्थळी भेट दिली. तात्काळ टिप्पर ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
अंबुलगा गावातील रकताटे हे शेतकरी कुटुंब असून शिवराज रकताटे यांना निकीता आणि अवधूत हे एकुलते एक भावंडे होती. त्यामुळे रकताटे कुटुंबांवर नियतीने घाला घातला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. निकीता व अवधूतने शिक्षण घेऊन आई वडिलांचे स्वप्न साकार करण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने उपस्थितांना अश्रु अनावर झाले नाही. राञी उशीरा आंबुलगा येथे दोन्ही भावंडावर अंत्यसंस्कार करण्यात आले.