

Jagannath Hendge death case Poorna Zerophata
पूर्णा : तालुक्यातील झिरोफाटा येथील हायटेक रेसिडेंसीयल स्कुल मध्य संस्थाचालक पती पत्नीच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या उखळद येथील हभप जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटुंबीयास आज (दि. १५) पांगरा ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच उत्तमराव ढोणे पाटील यांनी ५ हजार रुपयाची आर्थिक मदत दिली. दरम्यान, उखळद ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांकडून फरार असलेल्या संस्थाचालकास तत्काळ अटक करुन त्यांना फाशीची द्यावी, व हेंडगे कुटुंबीयांना न्याय द्यावा, या मागणीसाठी आज परभणी जिल्हा कचेरीवर जन आक्रोश मोर्चा काढला. यावेळी सरपंच उत्तमराव ढोणे यांनी सदर कुटुंबीयाचे सांत्वन करुन आर्थिक मदत दिली. या प्रसंगी अनेकांनी अनेक दानशूर व्यक्तींनी हेंडगे कुटुंबीयांना आर्थिक मदत देवून दिलासा दिला.
दरम्यान, असंख्य जनसमुदायांचा जन आक्रोश मोर्चा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील उपोषण स्थळी दाखल झाला. या प्रसंगी, व्यासपीठावर दोन मुली व एक मुलगा व नातेवाईकांसह उपस्थित असलेल्या हेंडगे यांच्या पत्नीला पतीची आठवण येताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. उपस्थितांनी त्यांची समजूत काढली. पतीला मारुन टाकल्याचे दु:ख अनावर झाल्या त्या गहीवरुन गेल्या होत्या. कुशीतील छोटी मुली देखील हताश झाली होती. तिसरी वर्गातील त्या पल्लवीने उठून सांगितले की, माझ्या वडिलांना मारुन टाकणा-यास फाशीची शिक्षा द्या.
जन आक्रोश मोर्चाचे वेळी उपस्थित नागरिकांतून व मोर्चाला संबोधित करणा-या मान्यवरातून "झिरोफाटा येथील हायटेक रेसिडेंसीयल स्कूल मध्ये संस्था चालक पती पत्नीने हभप जगन्नाथ हेंडगे यांना अमानुष मारहाण करुन खून केल्या प्रकरणी सदर घटनेतील मारेकऱ्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या पूर्णा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त करत त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. असा सूर आळवण्यात आला. यावर पोलीस अधिकारी यशवंत काळे यांनी या घटनेचा तपास डीवायएसपी यांच्याकडे असल्याचे सांगितले.