

Two people attacked at gunpoint in Manawat! A case has been registered against seven to eight persons
मानवत : पुढारी वृत्तसेवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बंदुकीचा धाक दाखवून तसेच तलवार, कुऱ्हाड आणि लाथाबुक्क्यांनी दोघांना मारहाण करून जखमी केल्याची गंभीर घटना २२ ऑक्टोबर रोजी सकाळी घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात सात नामनिर्दिष्ट व्यक्तींसह इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या वादातून धमकी दिल्याचा आरोप
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, तक्रारदार मुंजा कोंडीराम साखरे (वय ३६, रा. बिडी कारखाना परिसर, मानवत) हे वाहनचालक म्हणून काम करतात. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास ते गरुड चौक येथे मोटारसायकलजवळ थांबले असताना हसन बागवान याने त्यांना अडवून, तुला जिवे मारून टाकतो,' अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. संबंधित व्यक्ती येता-जाता आपल्याकडे रागाने पाहत असल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली घटना
तक्रारीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार हे डॉ. अंकुश लाड यांची फॉर्च्युनर कार घेऊन त्यांच्या घराकडे जात होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात चारचाकी वाहन व सुमारे १० ते १२ मोटारसायकली रस्त्यावर उभ्या असल्याने त्यांनी आपली गाडी थांबवली.
त्याचवेळी हसन बागवान हा चार चाकी गाडीतून खाली उतरला आणि मुंजा साखरे याच्याकडे बंदूक रोखून डॉ. अंकुश लाड कुठे आहे, त्यांला संपवून टाकायचे आहे, असे म्हणाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदाराने त्यांना आपण गरीब असून संबंधित व्यक्ती कुठे आहेत, याची माहिती नसल्याचे सांगितल्याचेही नमूद आहे.
तलवार व कुऱ्हाडीने वार केल्याचा आरोप
यानंतर युनूस बागवान हा हातात तलवार घेऊन तेथे आला आणि डॉ. अंकुश लाड भेटले नाहीत तर त्यांना संपवून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर बीलाल युनूस बागवान याने तलवारीने तक्रारदाराच्या उजव्या तळहातावर वार केल्याचा आरोप आहे. अली रफीक बागवान याने कुऱ्हाडीच्या दांड्याने तक्रारदाराच्या उजव्या हातावर मारल्याचे, तर रशीद बागवान व त्याच्या मुलांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले आहे.
या घटनेत तक्रारदाराचा मित्र रवी हिरालाल मुंडेल यालाही बीलाल याने तलवारीने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर तक्रारदार बेशुद्ध झाल्याचे आणि रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास शुद्धीवर आल्यानंतर आपण न्यूरान हॉस्पिटल, परभणी येथे उपचार घेत असल्याचे समजल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यांचा मित्रही उपचारासाठी रुग्णालयात दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे.
सात जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणात हसन बागवान, युनूस बागवान, बबलाल बागवान, अली बागवान, अजीज गणणी बागवान, रशीद बागवान आणि रफीक बागवान यांच्यासह इतर व्यक्तींविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव जमवून दोघांना शस्त्रांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
मानवत पोलिस ठाण्यात २४ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.४० वाजता याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. शस्त्र अधिनियमातील कलम ३, ४ व २५, महाराष्ट्र पोलिस अधिनियमाचे कलम १३५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल उत्तमराव खिल्लारे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.
पोलिस तपासाकडे लक्ष
बंदुकीचा धाक दाखविणे, धारदार शस्त्रांनी हल्ला करणे आणि दोघांना जखमी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या घटनेमागील नेमके कारण, कथित शस्त्रांचा वापर, घटनेत सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची भूमिका आणि प्रत्यक्ष घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.