

बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी गावात 21 ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालून अनेक ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. मात्र नागरिक जागे झाल्याने बहुतेक ठिकाणी त्यांचा डाव फसला. अनिल वस्सेकर यांच्या घरात प्रवेश करून सोने, चांदी व पन्नास हजार रुपयांची रोकड असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरट्यांनी पेट गल्लीमार्गे गावात प्रवेश करून घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर माळी गल्ली व इतर भागात मोर्चा वळवला. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या वाड्याच्या परिसरातही प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र यश आले नाही. परंतू अनिल वस्सेकर यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील व डब्यांतील दागिने व रोकड चोरट्यांनी लंपास केली.
घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलीस उपनिरीक्षक एस. एन. थोरवे यांच्यासह ठसे पथक व एलसीबीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फिंगरप्रिंट व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. चोरट्यांचा सहा ते सात जणांचा गट असून, ही ‘चड्डी गँग’ असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आले आहे. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.