

The patient had to be taken to the hospital on a motorcycle
मानवतः पुढारी वृत्तसेवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी सुरू करण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेचा मानवत तालुक्यात पुन्हा एकदा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. दंश झालेल्या एका रुग्णाला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्याची आवश्यकता असताना रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर मोटारसायकलवरून प्रवास करण्याची वेळ आल्याने संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरी ओम आसाराम निर्मळ हे बुधवारी (दि. १२) दुपारी सुमारे ३.१५ वाजता सोयाबीन शेतात काम करत असताना त्यांना कशाचा तरी दंश झाला. त्यानंतर त्यांना तातडीने मानवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दंश नेमका कोणत्या प्राण्याचा झाला हे स्पष्ट होत नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना परभणी जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला.
रुग्णाला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांनी १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला. मात्र "सध्या कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध नाही," असे सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. परिणामी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करूनही मदत न मिळाल्याने अखेर रुग्णाला मोटारसायकलवरून परभणीकडे रवाना करावे लागले.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने माता व बालकाचा मृत्यू झाल्याची घटना चर्चेत असताना पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या मते, ज्या रुग्णालयांमधून मोठ्या प्रमाणावर रेफरल रुग्ण पाठविले जातात, त्या ठिकाणीच रुग्णवाहिका कायमस्वरूपी उपलब्ध असणे आवश्यक आहे. अन्यथा आपत्कालीन सेवांचा उद्देशच अपूर्ण राहतो. मानवत ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र १०८ रुग्णवाहिका कायमस्वरूपी तैनात करावी तसेच जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिकांच्या थांब्यांचे पुनर्नियोजन करून रुग्णभाराच्या प्रमाणात त्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
थांब्यांच्या नियोजनामुळे वाढतोय विलंब ?
या घटनेनंतर १०८ रुग्णवाहिकांच्या थांब्यांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या मते, रुग्णांचे स्थलांतर सर्वाधिक प्रमाणात ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांतून केले जाते. मात्र अनेक १०८ रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रांवर तैनात करण्यात आल्या आहेत. मानवत तालुक्यातील परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. तालुक्याचे प्रमुख संदर्भ रुग्णालय असलेल्या मानवत ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेचा थांबा नसून, संबंधित गाड्या रामपुरी व कोल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर तैनात असल्याचे सांगितले जाते