गंगाखेडमध्ये ठाकरे गटाला धक्का: विशाल कदम यांनी उचलला 'धनुष्यबाण'
आनंद ढोणे
पूर्णा: येथील रहिवासी तथा उध्दव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी अखेर आज (दि. ६) दुपारी नांदेड येथील मार्केट कमिटी मैदानावरील कार्यक्रमात शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुत्ती महाविजय आभार यात्रा भव्य कार्यक्रमात झाला. यावेळी कदम यांचा प्रवेश झाला. त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. (Parbhani Shiv Sena)
विशाल कदम यांनी अनेक वर्षांपासून परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. त्यानंतर कदम यांनी ठाकरे गटाशी एकनिष्ठता राखत खासदार बंडू जाधव यांच्या समवेत कायंम राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गंगाखेड मतदारसंघात ठाकरे गट सेनेची पकड मजबूत ठेवली. त्यांनी गंगाखेड विधानसभेची निवडणूक २०१९ मध्ये धनुष्यबाण चिन्हावर लढवली. त्यानंतर २०२४ ची विधानसभा निवडणूक मशाल चिन्हावर ताकदीनीशी लढवली. परंतु, त्यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला.
कदम यांनी नगराध्यक्ष, मार्केट कमिटी संचालक आदी पदावर यशस्वीपणे कामगिरी बजावली. आता आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून त्यांच्याकडे मोठे जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

