Sand Mafia : ताडकळस पोलिसांची 'रेती माफियांवर' कागदी कारवाई; १ ब्रासवर धाड, मात्र ६ ब्रासचे हायवा-टिप्पर मोकाट!

ताडकळस परीसरातील ​देऊळगाव दुधाटे, मुंबर, देवठाना, धानोरा काळे व वझुर, खरबडा, कळगाव,निळा परिसरातील अवैध वाळू वाहतूकदारांना अभय कोणाचे? नागरिकांचा थेट सवाल.
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

Tadkalas police's action against 'sand mafias' is merely on paper

ताडकळस : पुढारी वृत्तसेवा स्थानिक गुन्हे शाखेने साबा फाटा परिसरात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत एका बोलेरो पिकअप वाहनावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांच्या या तुटपुंज्या कारवाईवर सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, "बड्या रेती माफियांना अभय आणि लहान वाहनांवर कारवाईचा आव" आणला जात असल्याची बोचरी टीका आता नागरिक करत आहेत.

नेमकी घटना काय?

३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०.०० वाजेच्या सुमारास साबा ते त्रिधारा पाटी दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विना नंबर प्लेट असलेल्या एका बोलेरो पिकअप वाहनाला (इंजिन क्र. TBK1K85553) पकडले. दुधना नदीच्या पात्रातून अवैधपणे उत्खनन करून १ ब्रास रेतीची वाहतूक केली जात होती. या प्रकरणी पोलीस अंमलदार रवीकुमार जाधव यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात संतोष वाकोडे, वाहन मालक सहाले चाउस आणि त्याच्या एका मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोह/१४२१ रणेर करत आहेत.

मोठ्या वाळू वाहतूकदारांना अभय कोणाचे?

एकीकडे १ ब्रास रेती वाहून नेणाऱ्या पिकअपवर तातडीने कठोर गुन्हे दाखल केले जातात, तर दुसरीकडे देऊळगाव, मुंबर, देवठाना, धानोरा काळे आणि वझुर या संपूर्ण परिसरातून दररोज ६ ब्रासचे हायवा आणि ३ ब्रासचे टिप्पर उघडपणे अवैध रेतीची वाहतूक करत असल्याचे चित्र आहे. हे अवजड हायवा आणि टिप्पर महसूल व पोलीस प्रशासनाच्या डोळ्यांदेखत बिनधास्त धावत असताना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? गोदावरी व पुर्णा नदीच्या पात्रातुन ताडकळस परीसरातील देऊळगाव दुधाटे ते वझुर, खरबडा,देवढाणा, मुबर, धानोरा काळे, कळगाव, निळा पट्ट्यातील या बेकायदेशीर वाळू वाहतूकदारांवर मेहेरनजर कोणाची आणि या अवैध धंदेवाईकांना नेमके अभय कोणाचे? असा थेट सवाल परिसरातील ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.

नागरिकांमधून तीव्र संताप

सर्वसामान्य नागरिकांच्या मते, ही कारवाई म्हणजे निव्वळ 'डोळ्यात धूळफेक' आणि 'आकडेवारी दाखवण्याचा प्रकार' आहे. बडे रेती माफिया मोकाट फिरत असताना आणि दुधना नदीचे पात्र ओरबाडले जात असताना, केवळ लहान वाहनांवर कारवाई करून प्रशासन स्वतःचे अपयश लपवत आहे. या दुटप्पी धोरणामुळे ताडकळस, परीसरातील कळगाव, देऊळगाव दुधाटे, मुंबर, देवठाना, धानोरा काळे व वझुर, खरबडा, निळा परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध प्रचंड असंतोष पसरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news