

पूर्णा, आनंद ढोणे : तालुक्यातील धानोरा काळे गावाजवळील गोदावरी नदीपात्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अतिवृष्टीचे अनुदान आणि २५ टक्के अग्रीम पीक विमा नुकसान भरपाई मिळत नसल्याने तसेच सोयाबीन कापसाचे पडलेले भाव आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागण्यांसाठी शनिवारी जलसमाधी आंदोलन केले.
तत्पूर्वी महसूल नायब तहसीलदार प्रशांत थारकर, तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव व प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील आय सी आय सी लोंबार्ड पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी सतिश बेदरे व अन्य एक अधिकारी यांनी पिक विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन आंदोलन करु नये यासाठी बोलणे घडवून आणले. परंतू मागण्या मान्य करण्याविषयी कोणतेही ठोस उत्तर मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी दुपारी १ वाजता गोदावरी नदीपात्रात उतरुन जलसमाधी आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे पाटील, तालुकाध्यक्ष पंडितराव भोसले व आंदोलनकर्ते शेतकरी 'दै. पुढारी'शी बोलताना म्हणाले की, जोपर्यंत प्रत्यक्षात मंजूर असलेली पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा नूकसान भरपाई व ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी अनुदान वर्ग होण्यास सुरुवात होत नाही, तोपर्यंत हे जलसमाधी आंदोलन सुरू राहणार. आम्ही गोदामायीत बुडून मेलोतरी मागे हटणार नाही. शेतक-यांना न्याय मिळवून देणारच, असा पवित्रा घेतला. दरम्यान, महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी सर्वोतोपरी खबरदारी घेत पाणबुडी बोट व ईतर रेस्क्यू टीम गोदावरी नदीपात्रात तैनात केली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील, सपोनि गजानन मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.