Parbhani news | वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर गायत्री थेट परीक्षेला; तिच्या जिद्दीचे कौतुक

कठीण प्रसंगातही दाखवलेल्या तिच्या धैर्यामुळे परीक्षा केंद्रावरील शिक्षक आणि उपस्थित विद्यार्थ्यांनाही तिच्या जिद्दीचे कौतुक वाटले
Parbhani news | वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर गायत्री थेट परीक्षेला; तिच्या जिद्दीचे कौतुक
Published on
Updated on

पेठ पिंपळगाव : वडिलांच्या पार्थिवाला अखेरचा निरोप देताच थेट परीक्षा केंद्र गाठणाऱ्या एका विद्यार्थिनीने पालम तालुक्याचे मस्तक अभिमानाने उंचावले आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कर्तव्याला प्राधान्य देत दहावीची परीक्षा देणाऱ्या गायत्री लक्ष्मण पौळ हिच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पालम तालुक्यातील फळा येथील लक्ष्मण पांडुरंग पौळ (वय ४२) यांचे दि.३ मार्च रोजी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली होती. बुधवारी (दि.४) सकाळी साडेदहा वाजता गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरात नातेवाईकांचा आणि ग्रामस्थांचा मोठा जमाव होता. दुःखद वातावरणात सर्वजण अश्रूंनी निरोप देत होते. मात्र याच वेळी लक्ष्मण पौळ यांची कन्या गायत्री लक्ष्मण पौळ हिची दहावीच्या बोर्ड परीक्षेतील हिंदी विषयाची परीक्षा होती.

वडिलांच्या निधनाचे असह्य दुःख मनात दडवून आणि डोळ्यातील अश्रू पुसत गायत्रीने कर्तव्याला प्राधान्य दिले. वडिलांच्या अंत्यविधीची सर्व प्रक्रिया आटोपताच तिने थेट परीक्षा केंद्राचा मार्ग धरला. सकाळी सुमारे ११ वाजता ती फळा येथून पालम येथील ममता विद्यालयातील परीक्षा केंद्रावर पोहोचली. वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, एवढेच शब्द उच्चारत तिने प्रश्नपत्रिका हातात घेतली आणि उत्तरपत्रिकेवर लेखणी चालवली. कठीण प्रसंगातही दाखवलेल्या तिच्या धैर्यामुळे परीक्षा केंद्रावरील शिक्षक आणि उपस्थित विद्यार्थ्यांनाही तिच्या जिद्दीचे कौतुक वाटले.

गायत्रीच्या या निर्णयाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून अनेकांनी तिच्या धाडसाला सलाम केला आहे. दुःखावर मात करत शिक्षणाच्या रणांगणात उतरलेली गायत्री आज खऱ्या अर्थाने संघर्षाची जिवंत प्रतिमा ठरली आहे. संकट कितीही मोठे असले तरी ध्येय डोळ्यासमोर ठेवले तर मार्ग नक्की सापडतो, याचा आदर्शच तिने घालून दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news