परभणी, पुढारी वृत्तसेवा: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २५ टक्के अग्रीम पीविमा भरपाई शेतकऱ्यांना तातडीने द्यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (दि.३०) परभणी- मानवत महामार्गावरील पेडगाव फाटा येथे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाने परभणी ते मानवत रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
जिल्ह्यातील सर्व ५२ मंडळात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस व अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीने संपूर्ण पिके पाण्याखालो गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. यासंदर्भात काँग्रेस कमिटीने दि. २५ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन शेतकऱ्यांना २५ टक्के विमा अग्रीम देण्यात यावी अन्यथा या प्रश्नावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या या प्रश्नाबाबत कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही.
खरीप २०२४ मधील सोयाबीन, कापूस, मुग, उडीद या सर्व पिकांचा अग्रीममध्ये समावेश करून अधिसूचना काढावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीने प्रशासनाकडे केली आहे, त्याचबरोबर खरीप २०२१ चा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडील पिकविमा उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्याचा आदेशही कृषी विभाग व रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला देण्यात यावा, असेही निवेदनात म्हटले आहे. २०२१ च्या काही शेतकऱ्यांकडे सीएससी केंद्रावरील बिमा भरलेल्या पावत्या आहेत. परंतु सरकारच्या पोर्टलवर खरीप २०२१ ची सद्यस्थिती तपासली असता नो पॉलिसी फंड असा संदेश येत आहे. त्यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधीची तात्काळ नेमणूक करून शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम देण्यात यावी, अशी मागणीही आंदोलनकत्यांनी यावेळी केली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश वरपूडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या रास्ता रोको आंदोलनात तालुकाध्यक्ष बाळासाहेब रंगे पाटील, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अजय चव्हाण, श्रीकांत पाटील, दिलीप साबळे, अजय चव्हाण, विनोद लोहगावकर, प्रदिप सोनटक्के, रमेश लाड, प्रताप रेंगे, उमेश मिरखेलकर, कैलास टेकाळे, कल्याण लोहट, सचिन लोहट, रौफ खान पठाण, विलास देशमुख, कांतराव देशमुख, सुहास देशमुख, बादल पठाण, उमाजी घुंगरे, संतोष कने, केशव घुले, रोहिदास बोबडे, नाना दळवे, भगवान शिर सेवाड, अशोक शिरसेवाड परिसरातील गावांतील शेतकरी सहभागी होते.