

परभणी : जिल्ह्यातील शेतकर्यांकडील सोयाबीन चोरी करणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. यात पथकाने शेतकर्यांचे 150 कट्टे सोयाबीन, हळदीचे 8 कट्टे, रोख 1 लाख 71 हजार तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकुण 12 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
परभणी जिल्ह्यात शेतकर्यांचे सोयाबीन, हळद आदी माल चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यांत दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेत पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना मार्गदर्शनपर सुचना देत या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. यावरून गुन्हे शाखेची विविध पथके तयार करून गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पथकांना रवाना करण्यात आले होते.
यातच दि. 20 मार्च रोजी या गुन्ह्यांची माहिती काढताना पथकाला याप्रकरणी गोपनीय व खात्रीशिर माहिती मिळाली. यावरून ज्ञानेश्वर शंकर पवार (वय 26,रा.राजीव गांधी नगर, सेलू) हा सेलू येथील आठवडी बाजारात असल्याचे समजले. त्याला सापळा लावून पथकाने मोठया शिताफीने ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने 11 साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. यामुळे पोलिसांनी सागर सुंदर काळे, कृष्णा सुंदर काळे, मिथून बापूराव काळे यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सेलू ठाण्यांतर्गत 4, बोरी अंतर्गत 2, जिंतूर अंतर्गत 1, चारठाणा अंतर्गत 1 तसेच परभणी ग्रामीण ठाण्यांतर्गत 1 अशा प्रकारचे 9 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
या आरोपींनी चोरलेल्या मालापैकी 150 कट्टे सोयाबीन, हळदीचे 8 कट्टे, रोख 1 लाख 71 हजार व चोरीसाठी वापरलेले वाहन असा 12 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करून 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात व अपर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे निरीक्षक विवेकानंद पाटील, सपोनि राजीव मुत्येपोड, अंमलदार हनमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, सुग्रिव केंद्रे, रणजीत आगळे, जमीर फारोखी, विष्णू चव्हाण, किशोर चव्हाण, संजय घुगे, सायबरचे गणेश कौटकर आदींनी केली.