पूर्णा: येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मोंढा बाजारातील आडत दुकानावर गत काही दिवसांपासून हंगाम चालू झाल्यानंतर काढणी केलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणून टाकले आहे. परंतू, केंद्र सरकारने विदेशातील सोयाबीन व मिलमध्ये सोयाबीनचे तेल काढल्यानंतरचे रॉ मटेरियल (डीओसी) देशात आयात करीत असल्यामुळे देशांतर्गतच्या शेतकऱ्यांनी पिकविलेल्या सोयबीनचे भाव पडून दरात मंदी आली आहे. त्यामुळे कमी भावात शेतकरी सोयाबीनची विक्री करत नसल्याने मोंढा बाजारात सौदेच होत नाही. त्यामुळे यार्डात सोयाबीन पोत्यांच्या थप्याच थप्प्या सर्वत्र पडून असल्याचे दिसून येत आहे.
यार्डात लावलेल्या थप्पीतून गोण्या रात्री चोरीला जावू नये, म्हणून आडत दुकानादाराने माणसे राखणीला लावली आहेत. बिट निघतेय पण सोयाबीनचा दर प्रति क्विंटल ४१०० ते ४२०० रुपयांपेक्षा वर चढत नसल्याने बिटाचा भाव पाहण्यासाठी आलेले शेतकरी इतक्या कमी दरात सोयाबीन विकत नाहीत. निदान क्विंटलला ५००० रुपये तरी दर मिळाला. तर कसेबसे परवडेल. परंतु याही पेक्षा कमीच भाव मिळत आहे. त्यामुळे मोंढा बाजारात सोयाबीनचे सौदेच होत नसल्यामुळे आडत दुकानदारासह मार्केट कमिटीचे कर्मचारी देखील हैराण झाल्याचे दिसून येत आहेत.
मोंढा बाजारा व्यतिरिक्त बाहेरील भुसार दुकानाला कृषी व पणन खात्याने शेतमाल खरेदी विक्रीचे परवाने दिल्यामुळे गरीब शेतकरी नाईलाजाने कमी भावात भुसार दुकानावर सोयाबीन विक्री करत आहे. त्यामुळे कमी भावात सोयाबीन मिळू लागल्याने भुसार दुकानदाराची सध्या चांदी होत आहे. आडत दुकानदार मात्र ठप्प झाल्याचे चित्र आहे. भुसार दुकानदारावर सहकार निबंधक व पणन खात्याचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे भुसारवाले आडत दुकानदारावर वरचढ ठरताहेत. त्याच बरोबर दरमंदीच्या फटक्याने मोंढा बाजारातील आडतीवर सोयाबीन खरेदी विक्रीचे व्यवहार होत नसल्यामुळे मार्केट कमिटीचे मोठे नुकसान होत आहे.
मोंढा बाजारातील काही महाठग व्यापारी आडत्याकडून झिरो मध्य सोयाबीन खरेदी करून कच्च्या पावतीत घेऊन झिरो मध्य मोंढ्यातून बाहेरील नांदेड, परभणी, हिंगोली, गंगाखेड येथील मिलला विक्रीसाठी पाठवत आहे. या प्रकारातून जीएसटीची बुडवणूक करुन शासनाची फसवणूक करत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याकडे जीएसटी खात्याने लक्ष घालण्याची गरज आहे.
यंदाच्या हंगामात सोयाबीन प्रति क्विंटल ४२०० रुपयांच्या वर जात नाही. परिणामी, शेतकरी सोयाबीन विक्रीस तयार होत नाही. त्यामुळे आडत दुकानांवर सध्या खरेदी विक्री व्यवहार ठप्प झाले आहेत. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर भाव वाढतील?अशी आशा होती. पण अजून दर वाढलेले नाहीत. यामुळे शेतकरी आणि आडत व्यापारी दोन्ही कृषी निगडित घटक संकटात सापडले आहेत. केंद्र व राज्य सरकारने आता तरी तोडगा काढून सोयाबीनचे दर वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
डॉ. शिवप्रसाद मोदाणी, आडत दुकानदार, पूर्णा