

पूर्णा : तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या काढणीपश्चात सोयाबीन पीक नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (पीएमएफबीवाय) अनेक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केले होते.
विमा कंपनीने स्पॉट सर्वे करून नुकसानग्रस्त अहवाल सादर केला आणि शासनाने १ हजार कोटींचा निधीही विमा कंपनीकडे वर्ग केला. त्यानंतर पीएमएफबीवाय पोर्टलवर संबंधित शेतकऱ्यांच्या पॉलिसीनुसार पोस्ट हार्वेस्ट नुकसान भरपाई मंजूर दाखवली गेली आहे. मात्र, भरपाईची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्यात प्रचंड नाराजी दिसून येत आहे.
मागील दहा दिवसांपासून क्लेम स्टेटस ‘अक्सेप्ट’ दाखवला जात असला तरी प्रत्यक्षात पैसे वर्ग न झाल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. शासनाकडून होत असलेल्या या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पावसाळी अधिवेशनात पुढील पंधरा दिवसांत नुकसान भरपाई खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
शेतकरी संघटनांनी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. अन्यथा सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शासनाने त्वरित काढणीपश्चात मंजूर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.