मंदीराचा निधी नाल्यांसाठी वळविल्याने भाविकांमध्ये संताप

Parbhani News | या अन्यायाविरोधात मंगळवारी (३१ मार्च) मंदिरात 'आत्मक्लेश' आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
मंदीराचा निधी नाल्यांसाठी वळविल्याने भाविकांमध्ये संताप
Published on
Updated on

सोनपेठ: येथील जगदंबा देवी मंदिराच्या सभामंडपासाठी मंजूर झालेला १ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने रद्द करून तो मानवत येथील नाल्यांच्या बांधकामासाठी वळविला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप लाट उसळली असून, या अन्यायाविरोधात मंगळवारी (३१ मार्च) मंदिरात 'आत्मक्लेश' आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे आणि तहसीलदारांमार्फत निवेदन देऊन भाविकांनी आपला तीव्र निषेध नोंदवला आहे.

निवडणुकीनंतर फिरले चक्र?

सोनपेठ नगर परिषद निवडणुकीपूर्वी आमदार राजेश विटेकर आणि माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी विविध धार्मिक स्थळांसाठी निधी आणल्याचा मोठा गाजावाजा केला होता. २९ ऑक्टोबर रोजी आमदारांच्या उपस्थितीत या सभामंडपाचे भव्य भूमिपूजनही पार पडले होते. मात्र, निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत आले असले तरी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाला. राजकीय समीकरणे बदलल्यानंतर आता हा हक्काचा निधी पळविल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

श्रद्धेचा अपमान केल्याचा आरोप

राज्य सरकारने १३ मार्च रोजी एका शुद्धीपत्रकाद्वारे मंदिराचा निधी रद्द करून तो मानवत शहरातील नाल्यांच्या कामासाठी वळवला. "हक्काचा निधी जाणीवपूर्वक नाल्यांच्या कामासाठी वापरणे हा भाविकांच्या श्रद्धेचा आणि भावनांचा अपमान आहे," अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रक्रियेत सहभागी असलेल्यांना सुबुद्धी मिळावी, यासाठी उद्या ३१ मार्च रोजी जगदंबा देवी मंदिरात सामूहिक आत्मक्लेश केला जाणार आहे.

लोकसहभागातून बांधणार सभामंडप

शासनाने निधी परत नेला असला तरी भाविक मागे हटणार नाहीत. मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम आता शासकीय निधीची वाट न पाहता लोकसहभागातून पूर्ण करण्याचा निर्धार निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. या निवेदनावर सुधीर बिंदू, कृष्णा पिंगळे यांच्यासह अनेक भाविकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news